सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसलाही सल्ला

डिलिमिटेशन विधेयकावरून सध्या राजकीय वातावरण तापलंय आणि याच मुद्द्यावर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांना चांगलाच टोला लगावलाय. संजय राऊतांना मनातून डिलिमिटेशन विधेयक मंजूर व्हावं असंच वाटतं, पण राजकीय विरोध करायचा म्हणून त्यांना बाहेरून विरोध करावा लागतोय, असा दावा बावनकुळेंनी केला आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रातील अनेक खासदार या विधेयकाच्या बाजूने असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
बावनकुळेंच्या म्हणण्यानुसार, सध्या अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये ४ ते ५ लाख मतदार आहेत. एवढ्या मोठ्या मतदारसंघात प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणं आणि विकासकामं करणं लोकप्रतिनिधींसाठी अवघड होतं. त्यामुळे डिलिमिटेशन झालं आणि मतदारसंघांची संख्या वाढली, तर मतदारसंघ छोटे होतील. परिणामी, लोकप्रतिनिधींना जनतेपर्यंत पोहोचणं सोपं होईल आणि सरकारच्या योजनाही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवता येतील. यासोबतच महिला आरक्षणाचा मार्गही या विधेयकातून मोकळा होणार असल्याचं बावनकुळे सांगतायत.
याच मुद्द्यावर त्यांनी सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसलाही विचार करण्याचा सल्ला दिलाय. सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं, तर त्या लोकप्रतिनिधींच्या खऱ्या मागणीला साथ देतील, असं बावनकुळे म्हणाले. हा केवळ एनडीएचा अजेंडा नसून सर्व लोकप्रतिनिधींचा अजेंडा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राहुल गांधी यांनी आपल्या खासदारांची मतं जाणून घ्यावीत, कारण नागपूरमधील काँग्रेस खासदारांनाही हे विधेयक मंजूर व्हावं असं वाटतं, असा दावा बावनकुळेंनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही खासदारांनी तर राहुल गांधी आमच्या इच्छा मारत असल्याची भावना व्यक्त केली आहे.
डिलिमिटेशनमुळे देशात मोठं परिवर्तन घडू शकतं आणि लोकप्रतिनिधींचं काम अधिक सोपं होऊ शकतं, त्यामुळे केवळ मोदी सरकारला विरोध करण्यासाठी या विधेयकाला विरोध करू नये, असं आवाहनही बावनकुळेंनी केलंय. दुसरीकडे, संजय राऊत यांनी सर्व खासदारांना १५० कोटी रुपयांचे आरोपी ठरवल्यासारखी विधानं करू नयेत, असा पलटवारही त्यांनी केला. खासदारांवर सरसकट आरोप करणं चुकीचं असून राऊतांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी बावनकुळेंनी केली.
दरम्यान, वाळू माफियांकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीच्या घटनांवरही बावनकुळेंनी भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईच्या सूचना दिल्या असून वाळू माफियांचे कंबरडे मोडण्याचं काम सरकारकडून सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता डिलिमिटेशन विधेयकावर विरोधक नेमकी काय भूमिका घेतात आणि खासदारांमध्ये खरंच या विधेयकाला किती पाठिंबा आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

