
सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव तब्बल 11,991 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 24 हजार रुपयांवर आला आहे. तर एक किलो चांदीचा दर 24,972 रुपयांनी घसरून 1 लाख 53 हजार रुपयांवर पोहोचला आहे. याआधी 13 नोव्हेंबर रोजी सोन्याचा दर 1.36 लाख रुपये, तर चांदीचा दर 1.78 लाख रुपये होता.
अमेरिकी डॉलर मजबूत होणे आणि उच्च दरांवर गुंतवणूकदारांकडून नफावसुली होणे ही या घसरणीमागची प्रमुख कारणं मानली जात आहेत. डॉलर मजबूत झाल्यास इतर देशांसाठी सोने खरेदी महाग होते. त्यामुळे मागणीवर परिणाम होऊन सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात. याशिवाय अमेरिकेतील व्याजदर जास्त राहिल्यास गुंतवणूकदार सोन्याऐवजी बाँड आणि बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. सोन्याचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर मोठे गुंतवणूकदार नफा मिळवण्यासाठी विक्री करतात. त्यामुळेही किमतींवर दबाव येतो.
चांदीच्या दरातील घसरणीमागे औद्योगिक मागणीतील बदल, जागतिक बाजारातील पुरवठा आणि सोन्याच्या किमतीतील घसरण ही कारणं आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, सौर पॅनेल आणि विविध उद्योगांमध्ये चांदीचा वापर होतो. औद्योगिक मागणी कमी झाल्यास किंवा पुरवठा वाढल्यास चांदीच्या दरावर परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती घसरल्याचा परिणामही अनेकदा चांदीवर दिसून येतो.
दरम्यान, यावर्षी सोने-चांदीच्या किमतींमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. दिलेल्या आकडेवारीनुसार, 31 डिसेंबर 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1.33 लाख रुपये होता. 29 जानेवारीला तो 1.76 लाख रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. तर चांदीचा दर याच काळात 2.30 लाखांवरून 3.80 लाख रुपये प्रति किलोपर्यंत गेला होता.
वेगवेगळ्या शहरांमध्ये सोने-चांदीचे दर काही प्रमाणात वेगळे असू शकतात. वाहतूक आणि सुरक्षा खर्च, स्थानिक मागणी-पुरवठा, ज्वेलरी असोसिएशनचे दर आणि व्यापाऱ्यांकडील जुन्या साठ्याची खरेदी किंमत यांचा स्थानिक दरांवर परिणाम होतो.
सोने खरेदी करताना BIS हॉलमार्क असलेले प्रमाणित सोनेच घ्यावे. तसेच खरेदीच्या दिवशीचा 24, 22 किंवा 18 कॅरेटचा दर, सोन्याचे वजन आणि अंतिम बिल तपासावे. चांदी खरेदी करताना तिची शुद्धता आणि हॉलमार्कची माहिती पडताळून पाहणेही महत्त्वाचे आहे.

