Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

Akwan Cyclone: अकवान चक्रीवादळाचा आंध्र-ओडिशाला तडाखा; ताशी 90 किमी वेगाने वारे, 4 लाख नागरिकांचं स्थलांतर

By Team Lagav Batti / November 20, 2026

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अकवान’ चक्रीवादळाने शुक्रवारी सकाळी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला धडक दिली. सकाळी 7.30 ते 8.30 च्या दरम्यान गोपालपूरजवळ वादळाने किनारपट्टी ओलांडण्यास सुरुवात केली. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी 70 ते 90 किलोमीटरपर्यंत पोहोचला. चक्रीवादळाची किनारपट्टी ओलांडण्याची प्रक्रिया सुरू असून भारतीय हवामान विभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या वादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे.

ओडिशामध्ये संभाव्य धोका लक्षात घेऊन सुमारे 4 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. त्यांच्या निवासासाठी 9,341 मदत छावण्या उभारण्यात आल्या असून बचावकार्यासाठी 423 पथकं तैनात करण्यात आली आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी यांनी आतापर्यंत मोठी वित्तहानी किंवा जीवितहानी झाल्याचं वृत्त नसल्याचं सांगितलं. दरम्यान, भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन डारिंगबाडी परिसरातील दोन गावांमधील 90 हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

चक्रीवादळाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. ईस्टर्न रेल्वेने 41, तर साउथ ईस्टर्न रेल्वेने 28 एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. याशिवाय 29 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेगाडीची स्थिती तपासण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

या चक्रीवादळाचा प्रभाव देशातील 10 राज्यांमध्ये जाणवण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात पाऊस सुरू असून सुंदरबन परिसरात जोरदार वारे वाहत आहेत. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. छत्तीसगडच्या रायपूरमध्येही पाऊस झाला आहे. झारखंडमधील धनबाद, बोकारो, सरायकेला-खरसावन, पूर्व सिंगभूम आणि पश्चिम सिंगभूम या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर तामिळनाडू, पुद्दुचेरी, तेलंगणा, बिहार आणि मध्य प्रदेशातील काही भागांतही पावसाची शक्यता आहे.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये चक्रीवादळाचा थेट धोका कमी झाला असला, तरी उत्तर भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. श्रीकाकुलममधील सोमपेटा परिसरात समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. मच्छिमारांनी मासेमारी थांबवून बोटी किनाऱ्यावर आणल्या आहेत. ओडिशातील पुरी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पुरीचे पोलीस आयजी सत्यजित नायक यांच्या माहितीनुसार, ODRF, NDRF आणि स्थानिक पोलीस पथकं किनारपट्टीवर गस्त घालत असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे.

सुरुवातीला अकवान चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याचा अंदाज होता. मात्र, गुरुवारी वादळाने मार्ग बदलल्याने ओडिशाच्या किनारपट्टीवरही त्याचा प्रभाव वाढला. दरम्यान, ‘अकवान’ हे नाव इराणने दिलं असून इराणी पौराणिक कथांमधील शक्तिशाली राक्षसाच्या नावावरून ते ठेवण्यात आलं आहे.

Previous

रक्ताच्या नात्यातील विवाहांवर निर्बंध घालण्याचा अधिकार संसदेलाच; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

More Posts

यूपीमध्ये नायलॉन मांजामुळे होणारा मृत्यू आता हत्या मानली जाणार; योगी आदित्यनाथांचा अधिकाऱ्यांना इशारा

यूपीमध्ये नायलॉन मांजामुळे होणारा मृत्यू आता हत्या मानली जाणार; योगी आदित्यनाथांचा अधिकाऱ्यांना इशारा

Leave a Comment / पर्यावरण / By Team Lagav Batti
Trade deal आहे तरी काय? भारतीय कृषी क्षेत्रासाठी 400 अब्ज डॉलर्सची संधी

Trade deal आहे तरी काय? भारतीय कृषी क्षेत्रासाठी 400 अब्ज डॉलर्सची संधी

Leave a Comment / पर्यावरण / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top