
पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. फर्ग्युसन कॉलेज रोड परिसरातील हॉटेल वैशाली आणि रुपाली रेस्टॉरंटचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सेफ फूड सेफ महाराष्ट्र (Safe Food Safe Maharashtra) मोहिमेअंतर्गत पुणे विभागातील या दोन्ही हॉटेल्सची तपासणी करण्यात आली होती.
वैशाली हॉटेलमध्ये तपासणीत काय आढळलं?
अन्न सुरक्षा अधिकारी अजिंक्य सुभाष उमाप यांनी 13 नोव्हेंबर 2026 रोजी हॉटेल वैशालीची तपासणी केली. या तपासणीत 98 पैकी केवळ 58 गुण मिळाले त्यामुळे हॉटेलची नोंद नियमांचे पालन न करणारी (नॉन-कम्प्लायन्स) अशी करण्यात आली. तपासणीदरम्यान स्वयंपाकघरातील जागा अपुरी असल्याचं आढळलं. महिलांच्या स्वच्छतागृहाच्या अगदी जवळ कच्चा माल ठेवण्यासाठी फ्रीजर ठेवण्यात आला होता. तर पुरुषांच्या स्वच्छतागृहालगत डोसा आणि उत्तप्पा तयार करण्यासाठी तवा ठेवलेला आढळला. धुतलेली भांडीही स्वच्छतागृहासमोरील टेबलवर ठेवण्यात आली होती.
याशिवाय उकडलेले बटाटे, शिजवलेला भात आणि इतर तयार पदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवण्यात आले होते. इडली आणि डोसा बॅटर तयार करण्याची प्रक्रियाही उघड्या जागेत सुरू असल्याचं तपासणीत समोर आलं. कच्च्या चिरलेल्या भाज्या तयार अन्नपदार्थांच्या वर ठेवण्यात आल्याने क्रॉस-कंटॅमिनेशनचा धोका असल्याचंही निदर्शनास आलं. स्वयंपाकघरात कीटकप्रतिबंधक दरवाजे नसणे, तापमानाच्या नोंदी उपलब्ध नसणे, पिण्याच्या पाण्याचा अद्ययावत चाचणी अहवाल नसणे आणि तपासणीच्या वेळी वैध प्रशिक्षित पर्यवेक्षक उपस्थित नसणे, अशा त्रुटीही आढळल्या.
महत्त्वाचं म्हणजे, जून 2026 मध्ये याच आस्थापनेची तपासणी करून सुधारणा नोटीस देण्यात आली होती. त्यानंतरही गंभीर त्रुटी कायम राहिल्याने सहायक आयुक्त (अन्न) सय्यद इम्रान हाश्मी यांच्या आदेशाने परवाना क्रमांक 11524035000395 तात्काळ निलंबित करण्यात आला.
रुपाली रेस्टॉरंटमध्येही नियमांचे उल्लंघन
रुपाली रेस्टॉरंटचीही 13 नोव्हेंबर रोजी अन्न सुरक्षा अधिकारी ए. डी. झांजुर्णे यांनी तपासणी केली. सुनावणीनंतर त्याच दिवशी परवाना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. या ठिकाणी स्वयंपाकघर उघडं आणि असुरक्षित असल्याचं आढळलं. त्यामुळे धूळ, घाण आणि कीटकांचा अन्नाच्या संपर्कात येण्याचा धोका निर्माण झाला होता. परिसरात पाणी साचलेलं, साफसफाई अपुरी आणि कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नसल्याचंही तपासणीत दिसून आलं.
कच्चा माल, अर्धप्रक्रियायुक्त आणि तयार अन्नपदार्थ योग्य प्रकारे झाकून ठेवलेले नव्हते. त्यावर लेबल आणि वापरण्याची अंतिम तारीखही नमूद केली नव्हती. कच्चे आणि तयार अन्न वेगळे ठेवण्याची व्यवस्था, तापमान नियंत्रणाच्या नोंदी, अन्न सुरक्षा व्यवस्थापन आराखडा (एफएसएमएस), प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) आणि प्रशिक्षणाच्या नोंदींचाही अभाव होता.
लेखी परवानगीशिवाय व्यवसाय करता येणार नाही
FDAच्या माहितीनुसार, दोन्ही हॉटेल्सच्या तपासणीत आढळलेल्या सर्व गंभीर त्रुटी दूर करून पुनर्तपासणीत अन्न सुरक्षा मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे. विभागाकडून लेखी परवानगी मिळेपर्यंत या हॉटेल्सना अन्न विक्री, पार्सल किंवा होम डिलिव्हरीचा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. आयुक्त श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) सय्यद इम्रान हाश्मी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

