
देशातील अनेक भागांमध्ये हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे, तर काही भागांत जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी विविध राज्यांना हवामानाचा इशारा दिला आहे.
उत्तर भारतातील डोंगराळ भागांवर पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख आणि आसपासच्या हिमालयीन भागात 12 आणि 13 नोव्हेंबरला पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये 12 नोव्हेंबरला काही ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टी होऊ शकते. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही 12 ते 15 नोव्हेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. या भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, काही ठिकाणी वेग 60 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात नव्या हवामान प्रणालीची निर्मिती होण्याची शक्यता आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात 13 नोव्हेंबरच्या आसपास कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं. ही प्रणाली पुढे वायव्येकडे सरकण्याची शक्यता असून, 14 नोव्हेंबरपर्यंत ती अधिक ठळक होऊ शकते. 15 नोव्हेंबरच्या आसपास तिची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता IMDने व्यक्त केली आहे.
दक्षिण भारतातही पावसाची शक्यता कायम आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये 12 ते 14 नोव्हेंबरदरम्यान पाऊस पडू शकतो. 15 नोव्हेंबरला या भागात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. केरळमध्ये 12 ते 15 नोव्हेंबरदरम्यान पाऊस, तर 16 आणि 17 नोव्हेंबरला काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि रायलसीमामध्ये 14 ते 17 नोव्हेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. अंदमान-निकोबार बेटांवर 12 ते 16 नोव्हेंबरदरम्यान मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
महाराष्ट्रासाठी सध्या दिलासादायक चित्र आहे. 12 ते 16 नोव्हेंबरदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या पावसाचा इशारा नाही. IMDच्या अंदाजानुसार या भागांत हवामान प्रामुख्याने कोरडं राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशाच्या काही भागांत पाऊस आणि बर्फवृष्टीचं चित्र असलं, तरी महाराष्ट्रावर सध्या त्याचा मोठा परिणाम दिसत नाही. मात्र बंगालच्या उपसागरातील नव्या प्रणालीची दिशा आणि तीव्रता पुढील दिवसांत बदलू शकते. त्यामुळे हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे.