Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

ग्रामीण भागात आजही जपल्या जातात दिवाळीच्या जुन्या परंपरा; खान्देश ते मराठवाडा, प्रत्येक भागाची दिवाळी खास!

By Team Lagav Batti / November 4, 2026

दिवाळी म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते पणत्यांचा प्रकाश, अंगणातील रांगोळी, घराघरांत तयार होणारा फराळ आणि पहाटेचं अभ्यंगस्नान. मात्र, ग्रामीण महाराष्ट्रात दिवाळीचं स्वरूप यापेक्षा खूप वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. शहरांमध्ये सण साजरा करण्याच्या पद्धती बदलत असतानाच गावागावांत आजही अनेक जुन्या प्रथा जपल्या जातात. कुठे गाई-म्हशींना ओवाळलं जातं, तर कुठे शेणापासून बळीराजा तयार करून त्याची पूजा केली जाते. काही आदिवासी समुदायांमध्ये नव्या पिकाची पूजा केल्याशिवाय नवीन हंगामातील धान्य खायला किंवा वापरायला सुरुवात सुद्धा केली जात नाही. खान्देश, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात प्रत्येक भागात दिवाळीला स्थानिक संस्कृतीचा वेगळा रंग पाहायला मिळतो.

खान्देशातील दिवाळी आणि बळीराजाची परंपरा

खान्देशातील दिवाळी म्हटलं की सर्वप्रथम आठवते ती वसुबारसाची खास परंपरा. खान्देशात काही ठिकाणी वसुबारसाला ‘गायगोऱ्ह्याची बारस’ असंही म्हटलं जातं. या दिवशी उपवास करून संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या भाजीचा नैवेद्य केला जातो. विशेष म्हणजे, या दिवशी अनेक घरांमध्ये गव्हाची पोळी खाल्ली जात नाही. शिवाय अनेक गावात किंवा घरात खीर-पुरीचा नैवेद्य दिला जातो. खान्देशातील दिवाळीच्या फराळात दराब्याचे लाडू आणि सांजोऱ्यांना विशेष महत्व आहे. दराब्याचे लाडू तयार करण्यासाठी गहू भिजवून त्याचा रवा काढला जातो आणि त्यात पिठीसाखर मिसळली जाते. तर रव्याला गूळ लावून सांजोऱ्या तयार केल्या जातात. खान्देशातील बलिप्रतिपदेची परंपराही वैशिष्ट्यपूर्ण आहे. पाडव्याच्या दिवशी काही ठिकाणी अंगणात शेणापासून बळीराजाची प्रतिमा तयार केली जाते. त्यावर दिवा ठेवून पूजा केली जाते. पूर्वी शेणापासून प्रतिमा तयार करण्याची पद्धत होती. मात्र आता काही ठिकाणी रांगोळीतून बळीराजाची आकृती काढली जाते. भाऊबीजेच्या दिवशीही काही भागांत दक्षिण दिशेला तोंड करून शेणाची पणती लावण्याची प्रथा आहे. या परंपरांमधून खान्देशातील स्थानिक लोकजीवन आणि धार्मिक समजुतींचं दर्शन घडतं.

मराठवाड्यात गाई-म्हशींना ओवाळण्याची परंपरा

मराठवाड्यातील ग्रामीण भागात दिवाळीचा संबंध शेती आणि पशुधनाशी जोडलेला दिसतो. काही गावांमध्ये दिवाळीच्या प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी गाई-म्हशींना ओवाळण्याची परंपरा आहे. गुराखी मुलं नदीकाठच्या लव्हाळ्यापासून दिवा ठेवण्यासाठी एक विशिष्ट स्टँड तयार करतात. त्यावर मातीचा दिवा ठेवून गोठ्यातील गाई-म्हशींना ओवाळलं जातं. यावेळी ‘दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी’ अशी पारंपरिक ओवी म्हटली जाते. या ओवीतून पशुधनाबद्दलचा जिव्हाळा आणि ग्रामीण जीवनातील त्यांचं महत्त्व अधोरेखित होतं. मराठवाड्यातील काही गावांमध्ये शेणापासून गोकुळ तयार करण्याची परंपराही आढळते. यामध्ये शेणापासून गोकुळातील विविध प्रतिमा तयार करून त्यातून पारंपरिक देखावा उभा केला जातो. काही ठिकाणी रेड्यांच्या टकरी आणि म्हशींच्या मिरवणुकीसारख्या स्थानिक प्रथांचाही दिवाळीच्या काळात उल्लेख आढळतो. मात्र, या प्रथा प्रत्येक गावात किंवा संपूर्ण मराठवाड्यात सारख्याच पद्धतीने पाळल्या जात नाही. गावागावांनुसार त्यांचं स्वरूप बदलतं.

हिंगोली, नांदेड, बीड भागात काही गावांमध्ये दिवाळीच्या पाडव्याला किंवा लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी गाई-म्हशींना नदीवर नेऊन अंघोळ घातली जाते. त्यांच्या शिंगांना हिंगूळ किंवा गेरू किंवा इतर रंग लावले जातात, गळ्यात घुंगरांच्या माळा घातल्या जातात आणि त्यांना पुरणपोळी खायला दिली जाते. याला काही भागात ढोरं नाचवणे किंवा पशूंचा सण असंही म्हणतात.

आदिवासी समाजात नव्या धान्याची पूजा

महाराष्ट्रातील काही आदिवासी समुदायांमध्ये दिवाळीला नव्या धान्याच्या पूजेचं विशेष महत्त्व आहे. काही ठिकाणी या उत्सवाला ‘गावदिवाळी’ असं म्हटलं जातं. शेतात नवीन पीक तयार झाल्यानंतर त्यातून आलेल्या नवधान्याची सामूहिक पद्धतीने पूजा केली जाते. ही पूजा झाल्यानंतरच नव्या हंगामातील धान्य खाण्यास सुरुवात करण्याची प्रथा काही समुदायांमध्ये आहे. विशेषतः देहवाली भिल्ल समाजाच्या संदर्भात ही परंपरा महत्वाची आहे. निसर्ग, शेती आणि सामूहिक जीवनाशी जोडलेली ही दिवाळी शहरी उत्सवापेक्षा वेगळी असते. नव्या पिकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि संपूर्ण समाजाने एकत्र येऊन सण साजरा करणं, हे या परंपरेचं खास वैशिष्ट्य आहे.

किल्ले, मातीच्या प्रतिमा बनवण्याची परंपरा

आजही आपण दिवाळीत लहान मुलांनी बनवलेले मातीचे किल्ले पाहतो. आणि ही परंपरा फक्त आपल्या माहाराष्ट्रातच दिसते. विशेषता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ही परंपरा विशेष लोकप्रिय आहे. सातारा जिल्ह्यातील आंबवडे बुद्रुकसारख्या गावांमध्ये दिवाळीच्या काळात महाराष्ट्रातील विविध गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करून त्यांचा इतिहास सांगण्याचा उपक्रम राबवला जातो. पूर्वी ग्रामीण भागात मातीच्या प्रतिमा आणि पारंपरिक देखावे तयार करण्याच्या पद्धतीही होत्या. आज काही ठिकाणी त्यांची जागा शिवकालीन किल्ल्यांच्या प्रतिकृतींनी घेतली आहे. त्यामुळे मुलांना इतिहासाची ओळख होण्यासोबतच गावातील लोकांना एकत्र येण्याची संधीही मिळते. हा, पण आज अनेक ठिकाणी जागेच्या अभावापायी, किंवा इतर कारणांनी म्हणा पण या परंपरासुद्धा लोप पावत चालल्या आहेत.

एकूणच, ग्रामीण महाराष्ट्रातील दिवाळी ही केवळ दिव्यांचा आणि फराळाचा सण नाही. ती शेतीशी, पशुधनाशी, निसर्गाशी, स्थानिक खाद्यसंस्कृतीशी आणि सामूहिक जीवनाशी जोडलेली आहे. खान्देशातील बळीराजाची पूजा असो, मराठवाड्यातील गाई-म्हशींना ओवाळण्याची पद्धत असो किंवा आदिवासी समाजातील नवधान्याची पूजा. या प्रत्येक परंपरेतून त्या त्या भागाचं वेगळेपण समोर येतं. काळानुसार सण साजरा करण्याच्या पद्धती बदलत असल्या, तरी गावागावांत जपल्या जाणाऱ्या या परंपरा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा ठेवा आहेत.

Previous

दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्यांना निवडणूक लढवता येणार? सर्वोच्च न्यायालयाकडून कायद्याच्या फेरविचाराचे संकेत…

More Posts

Yashwantrao Holkar: भारताचा नेपोलियन बोनापार्ट… महाराजा यशवंतराव होळकर

Yashwantrao Holkar: भारताचा नेपोलियन बोनापार्ट… महाराजा यशवंतराव होळकर

Leave a Comment / इतिहास / By Team Lagav Batti
प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment / Uncategorized / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top