पुण्यातील वर्दळीच्या सारसबाग परिसरात एका बंद कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. नेहरू स्टेडियमसमोर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एक कार एकाच ठिकाणी उभी होती. या कारमधून अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला. त्यांनी तातडीने खडक पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारची तपासणी केली असता, आत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह फुगलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर ही कार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उभी होती. सुरुवातीला कारकडे कोणाचे विशेष लक्ष गेले नाही. मात्र, कारमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर स्थानिक नागरिकांना काहीतरी अघटित घडल्याचा संशय आला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडून पाहिला असता, आतील सीटवर एका तरुणाचा मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था पाहता तो काही काळापासून कारमध्ये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मृत तरुणाची ओळख पटली असून शुभम बनसोडे असे त्याचे नाव आहे. तो काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा आणि कारमध्ये मृतदेह आढळण्याच्या घटनेचा संबंध तपासला जात आहे. शुभमचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण समजू शकणार आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. ही कार नेमकी कोणी आणि कधी येथे आणून उभी केली, तसेच शुभमचा मृत्यू कारमध्येच झाला की त्याचा मृतदेह नंतर तेथे ठेवण्यात आला, याचा तपास केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांकडून घटनेशी संबंधित माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सारसबागेसारख्या गजबजलेल्या परिसरात बंद कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.

