तामिळनाडूच्या राजकारणात चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा प्रभाव काही नवीन नाही. अभिनेता विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. तो अभिनेता म्हणजे धनुष! गेल्या काही महिन्यांतील त्याच्या हालचालींमुळे धनुषही विजयच्या पावलावर पाऊल ठेवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनुषने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात RSS च्या दक्षिण विभागाशी संबंधित एका वरिष्ठ नेत्याची दोनदा भेट घेतली. त्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या संघटनेतही महत्त्वाचे बदल करण्यात आले. पूर्वी ‘धनुष नर्पनी मंद्रम’ म्हणून ओळखली जाणारी संघटना आता ‘धनुष नर्पनी इयक्कम’ अर्थात धनुष कल्याणकारी चळवळ म्हणून काम करत आहे.
25 ऑक्टोबरला चेन्नईजवळ आयोजित कार्यक्रमात धनुषने या संघटनेशी संबंधित 2,500 हून अधिक महिला समर्थकांची भेट घेतली. पांढरा शर्ट आणि धोतर परिधान करून आलेल्या धनुषने महिलांशी संवाद साधला, फोटो काढले आणि त्यांना चांदीचे कामाक्षी दिवे भेट दिले. मात्र, पत्रकारांनी राजकीय प्रवेशाबद्दल विचारलं असता त्याने थेट उत्तर देणं टाळलं.

विशेष म्हणजे विजयनेही राजकारणात येण्यापूर्वी आपल्या चाहत्यांच्या संघटनेचं लोकचळवळीत रूपांतर केलं होतं. सामाजिक उपक्रम, विद्यार्थ्यांचा सत्कार आणि जनसंपर्काच्या माध्यमातून त्याने राजकीय पाया मजबूत केला. धनुषच्या संघटनेकडूनही अशाच शैक्षणिक उपक्रमांचं नियोजन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, धनुषच्या हालचालींवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते मणिकम टागोर यांनी यामागे भाजप-RSS ची रणनीती असल्याचा आरोप केला आहे. तर विजयच्या TVK पक्षानेही दिल्लीतील नेते नव्या चेहऱ्यांना प्रोत्साहन देत असल्याचा दावा केला. दुसरीकडे AIADMK ने धनुषला आपल्या पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं आहे.

मात्र, RSS नेत्यांसोबत झालेल्या भेटी म्हणजे भाजपसोबत राजकीय समझोता झाल्याचा पुरावा नाही. धनुषनेही अद्याप राजकारणात प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे विजयपाठोपाठ धनुषही तामिळनाडूच्या राजकीय मैदानात उतरणार का, याची उत्सुकता वाढली आहे.

