महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या मुद्द्यावरून राज्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड घडली आहे. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर गेल्याने त्यांच्या अनुपस्थितीत सदस्य सतीश बबन वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या वतीने यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. या प्रकरणात आयोगातील काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याचेही समोर आले. त्यानंतर परीक्षांमधील गैरप्रकारांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात आंदोलन सुरू केले होते.
या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी तब्बल दहा दिवस आंदोलन केले. राज्य सरकारच्या वतीने मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. आयोगातील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन सरकारने दिले. त्याचबरोबर विवेक भीमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यातील आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, सतीश बबन वाघोले हे सप्टेंबर २०२६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य झाले होते. ७ सप्टेंबर रोजी तत्कालीन अध्यक्ष विवेक भीमनवार यांनीच त्यांना सदस्यपदाची गोपनीयतेची शपथ दिली होती. आता अवघ्या महिनाभरात बदललेल्या परिस्थितीत त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
दुसरीकडे, विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार राज्य सरकारने पेपरफुटी आणि आयोगातील गैरप्रकारांच्या चौकशीसाठी आयोग स्थापन करण्याची अधिसूचनाही जारी केली आहे. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले हे या चौकशी आयोगाचे अध्यक्ष असतील. निवृत्त न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्यासह तुकाराम मुंढे, गणेश पाटील आणि लखामी गौतम यांचाही आयोगात समावेश असल्याचे वृत्त आहे.
आता या चौकशी आयोगाच्या माध्यमातून पेपरफुटी प्रकरणातील तथ्य समोर येणार का, दोषींवर कोणती कारवाई होणार आणि MPSC परीक्षांच्या विश्वासार्हतेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला प्रश्न कसा सोडवला जाणार, याकडे राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

