मराठी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा मधू कांबीकर यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आजारपणाशी झुंज देणाऱ्या मधू कांबीकर यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि लोककला क्षेत्रातील एक मोलाचं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे.

मधू कांबीकर यांची ओळख केवळ चित्रपट अभिनेत्री म्हणून नव्हे, तर लावणी सम्राग्नी म्हणून होती. मराठी लोककलेचा वारसा त्यांनी आपल्या नृत्यातून आणि अदाकारीतून जपला. विशेषतः लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री म्हणून त्या घराघरांत पोहोचल्या. ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी सहजसुंदर अभिनय केला. अभिनेते दादा कोंडके यांच्यासोबत ‘मला घेऊन चला’ आणि ‘येऊ का घरात’ यांसारख्या चित्रपटांतून ही जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती.
दरम्यान, २०१६ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांना पॅरालिसिसचा झटका आला होता. त्यानंतर त्या पूर्णपणे अंथरुणाला खिळल्या होत्या. गेली जवळपास १० वर्षं त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अखेर वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

पडद्यावर निखळ मनोरंजन करणाऱ्या मधू कांबीकर यांच्या खऱ्या आयुष्यात एक असा प्रसंग घडला होता, जो वाचून अंगावर काटा येतो. ‘कोल्हाट्याचं पोर’ या पुस्तकात नमूद केलेल्या कथेनुसार, त्यांच्या करिअरच्या सुवर्णकाळात त्यांच्या अपहरणाचा कट रचण्यात आला होता. एके दिवशी तीन व्यक्ती त्यांच्या घरी आल्या आणि आपण एका नव्या मालिकेची निर्मिती करत असून त्यात मुख्य भूमिका करण्यासाठी त्यांनी विचारणा केली. त्यांनी प्राथमिक कथानक ऐकवून पुढील चर्चेसाठी एका अनोळखी बंगल्यावर येण्यास सांगितलं.
मात्र, त्या तिघांच्या संशयास्पद बोलण्यामुळे आणि वागण्यामुळे मधू कांबीकर यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. घाबरून न जाता त्यांनी स्वतःला सांभाळत एक युक्ती लढवली. ठरल्याप्रमाणे त्या त्यांच्या गाडीत बसल्या, पण प्रवासादरम्यान त्यांनी गाडी दादरच्या दिशेने वळवण्यास सांगितली. दादरमध्ये आपल्या एका मैत्रिणीकडे महत्त्वाचे काम असल्याचे सांगत त्यांनी गाडी थेट अभिनेते दादा कोंडके यांच्या बंगल्याजवळ आणून थांबवली.

त्यांनी थेट दादांच्या घरी जात घडलेला सर्व प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकल्यानंतर दादा कोंडके यांना हा अपहरणाचा गंभीर कट असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखले. बाहेर गाडीत थांबलेल्या त्या तिघांना मैत्रिणीने चहासाठी बोलावलं आहे, असं सांगून बंगल्यात घेऊन येण्यास त्यांनी मधू यांना सांगितलं. मधू यांनी तसंच केलं आणि ते तिघे आत येताच दादांनी बंगल्याचे दरवाजे बंद करून घेतले.
त्यानंतर आपल्या धिप्पाड अंगरक्षकांना बोलावून दादांनी त्या तिघांची चांगलीच कानउघाडणी करत त्यांना चोप दिला. दादांच्या धाकामुळे ते तिघे पूर्णपणे घाबरले आणि त्यांनी आपण मालिका बनवण्यासाठी नव्हे तर अपहरणाचा कट रचण्यासाठी आल्याची कबुली दिली. योग्य वेळी मधू कांबीकर यांनी दाखवलेली हुशारी आणि दादा कोंडके यांनी केलेल्या मदतीमुळे त्या एका मोठ्या आणि भयानक संकटातून सुखरूप बाहेर पडल्या होत्या.

आज मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवरची एक लावणीसम्राग्नी आणि कसदार अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यांच्या चित्रपटांमधील भूमिका, लावणीची अदाकारी आणि आयुष्यातील हा संघर्षमय प्रवास प्रेक्षकांच्या मनात सदैव कायम राहील.


