महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना इशारा; विदर्भ-मराठवाड्यात जोर वाढणार
गेल्या काही दिवसांपासून काहीसा विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत पुन्हा एकदा वादळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याचा वारा पाहायला मिळू शकतो. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात २४ आणि २५ सप्टेंबरला काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यातही २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान पाऊस, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरातील प्रणालीचा महाराष्ट्रावर परिणाम
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली कमी दाबाची प्रणाली अधिक सक्रिय होत असून, तिच्या प्रभावामुळे देशाच्या पूर्व आणि मध्य भागात पावसाचे वातावरण तयार झाले आहे. ही प्रणाली पश्चिम-उत्तरपश्चिम दिशेने पुढे सरकण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील काही भागांतही तिचा परिणाम जाणवू शकतो. यासोबतच अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांची स्थिती आणि वातावरणातील इतर प्रणाली यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.
विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा जोर
हवामान विभागाच्या सध्याच्या अंदाजानुसार विदर्भात आजपासून पावसाची तीव्रता वाढू शकते. २४ आणि २५ सप्टेंबरला काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ यांसह विदर्भातील अनेक भागांमध्ये हवामानावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. मराठवाड्यातही धाराशिव, लातूर, नांदेड आणि परिसरात पावसासोबत विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे होण्याची शक्यता आहे. २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान या भागासाठी हवामान विभागाने विशेष इशारा दिला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही वादळी पाऊस
फक्त विदर्भ आणि मराठवाडाच नाही, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांनाही पावसाचा फटका बसू शकतो. कोकण-गोव्यात २३ सप्टेंबरला मुसळधार पाऊस तसेच मेघगर्जना आणि विजांचा इशारा आहे. २४ सप्टेंबरलाही वादळी हवामानाची शक्यता कायम आहे. मध्य महाराष्ट्रातही २३ सप्टेंबरला मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेचा अंदाज आहे. २४ आणि २५ सप्टेंबरला काही भागांत जोरदार वारे आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्येही पावसाची शक्यता
छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली, तरी आता पुन्हा वातावरण बदलण्याची चिन्हे आहेत. शहरात २३ आणि २४ सप्टेंबरला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यानंतर २५ आणि २६ सप्टेंबरला वाऱ्याचा जोर जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरातील तापमानात गेल्या काही दिवसांत वाढ झाल्यामुळे उकाडाही जाणवत आहे. त्यामुळे पावसाच्या आगमनामुळे तापमानात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे.
परतीच्या मान्सूनलाही वेग येणार?
दरवर्षी सप्टेंबरच्या उत्तरार्धात देशाच्या वायव्य भागातून मान्सूनची माघार सुरू होते. यंदाही पुढील काही दिवसांत वायव्य भारताच्या आणखी काही भागांतून मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्याची शक्यता आहे. मात्र, देशाच्या मध्य आणि दक्षिणेकडील काही भागांत अजूनही पावसाच्या प्रणाली सक्रिय असल्याने महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत अधूनमधून वादळी पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे निघून गेलेला नाही. उलट बंगालच्या उपसागरातील बदलत्या हवामानामुळे पुढील दोन-तीन दिवस राज्यातील अनेक भागांत पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो. नागरिकांनी विशेषतः वादळी वारे, वीज आणि मुसळधार पावसाच्या काळात आवश्यक ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.