नवरात्रोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वीच महाराष्ट्रात गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्यांच्या ओळखीवरून वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी गरबा आयोजकांनी कार्यक्रमात प्रवेश देण्यापूर्वी सहभागींची ओळख तपासावी, अशी भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे, गरब्यात येणाऱ्या प्रत्येकाकडून हनुमान चालीसा म्हणवून घेतली पाहिजे, असंही राणे यांनी म्हटलं आहे. विश्व हिंदू परिषदेने यापूर्वी गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्यांकडे आधारकार्ड किंवा ओळखपत्र असावं, अशी भूमिका मांडली होती. या भूमिकेला नितेश राणे यांनी पाठिंबा दिला. गरबा आणि नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी सहभागी होणाऱ्या व्यक्तीची ओळख स्पष्ट असणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं. गरब्याच्या माध्यमातून काही तरुण हिंदू नाव सांगून किंवा कपाळावर टिळा लावून हिंदू मुलींशी संपर्क साधतात आणि त्यानंतर फसवणुकीचे प्रकार घडतात, असा दावा राणे यांनी केला. अशा घटनांना आळा घालण्यासाठी गरबा आयोजकांनी प्रवेशाच्या वेळी ओळख तपासावी, असं त्यांनी सांगितलं.

मुस्लिम तरुणांबाबतही राणेंची भूमिका
मुस्लिम तरुणांना गरबा उत्सवात सहभागी व्हायचं असल्यास त्यांनी हिंदू धर्म स्वीकारावा, त्यानंतर हिंदू पद्धतीने उत्सवात सहभागी व्हावं, अशी भूमिकाही नितेश राणे यांनी मांडली. हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर टिळा लावणे, मूर्तीपूजा करणे, हनुमान चालीसा म्हणणे, देवीची आरती करणे आणि गरब्यात सहभागी होण्यास हरकत नसल्याचं त्यांनी म्हटलं.
‘डीजेचा नियम सर्वांसाठी समान असावा’
हिंदू सणांमध्ये डीजेच्या आवाजावरून होणाऱ्या चर्चेवरही राणे यांनी भाष्य केलं. डीजेमुळे त्रास होत असेल तर ईदच्या मिरवणुकीसह सर्व धार्मिक कार्यक्रमांनाही समान नियम लागू झाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. रस्त्यावर नमाज, मशिदींवरील भोंगे आणि मिरवणुकांमधील डीजे या सर्व बाबतीत कायदा समान असावा, असं राणे म्हणाले.
संजय राऊतांकडून टीका
दरम्यान, नितेश राणे यांच्या गरबा आणि हनुमान चालीसासंदर्भातील वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली. राणे यांचं नाव न घेता, “तुम्ही मंत्री असाल तर मंत्र्यासारखं वागलं पाहिजे,” असं राऊत म्हणाले. गरब्यातील प्रवेशासाठी ओळख तपासणी, टिळा आणि हनुमान चालीसा याबाबत नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

