मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या जरांगेंनी आता मुंबईतील आंदोलनाची रणनीती जाहीर केली आहे. थेट मोर्चा काढण्याऐवजी ‘गनिमी कावा’ पद्धतीने मराठा समाजाने हळूहळू मुंबईत दाखल व्हावं, असं आवाहन त्यांनी समर्थकांना केलं आहे. जरांगेंनी 12 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्याआधीच समर्थकांनी मुंबईत पोहोचून विविध ठिकाणी राहण्याची तयारी करावी, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत मराठा आंदोलनाची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘आजपासून मुंबईत जाऊन राहा’
जरांगे पाटील यांनी समर्थकांना मुंबईत नातेवाईक, मित्र आणि परिचितांकडे राहण्याचं आवाहन केलं आहे. केवळ आझाद मैदानावर गर्दी करण्याऐवजी मुंबईतील विविध भागांमध्ये राहण्याची रणनीती त्यांनी सांगितली. “आजपासून 12 दिवस मुंबईला जाऊन राहा. पोलिसांनी उचलून नेलं तर तिथे राहा. जामीन घेऊ नका,” असं आवाहन जरांगेंनी केलं आहे. तसंच, मुंबईत मराठे दाखल झाल्याची माहिती लगेच कुणालाही कळू नये, अशा पद्धतीने आंदोलन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
‘झोपून राहणे आणि रेटून खाणे’ आंदोलन
मुंबईतील आंदोलनाचं स्वरूप कसं असेल, याबाबतही जरांगेंनी भाष्य केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘झोपून राहणे आणि रेटून खाणे’ अशा पद्धतीचं आंदोलन केलं जाणार आहे. “सर्व मागण्यांची अंमलबजावणी केल्यानंतरच उपोषणावर तोडगा निघेल. आमची दारं चर्चेसाठी खुली आहेत. इथेच चर्चा होईल,” असं जरांगे म्हणाले. मुंबईकरांची गैरसोय होण्याबाबत विचारलं असता त्यांनी, “त्यांची काय कोंडी होणार आहे?” असा सवालही केला.
गणेशोत्सवात आंदोलनावरुन टीकेला उत्तर
यंदा गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करण्याच्या निर्णयावरही टीका होत आहे. यावर जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्या एवढा गणपती कुणीही बसवत नाही. ते आम्हाला गणपती शिकवतात. आमच्याएवढं देव-देव कुणीही करत नाही,” असं म्हणत त्यांनी गणेशोत्सवाच्या मुद्द्यावरून होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं. सरकारसोबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
‘5 ते 50 लाख पोरं मुंबईत गेली पाहिजेत’
मुंबईत समर्थकांनी एकाच वेळी दाखल न होता हळूहळू पुढे जाण्याची रणनीती आखावी, असं जरांगेंनी सांगितलं आहे. “मुंबईला जाणाऱ्यांनी हळूहळू पुढे चालावं. माझ्यासोबत जास्त कुणी राहू नका. पोलिसांना त्रास देऊ नका,” असं त्यांनी म्हटलं. मुंबईतील मराठा समाजाच्या घरांमध्ये राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. मुंबईत जवळपास 1 ते 2 लाख मराठ्यांची घरं असल्याचा दावा करत, या घरांमध्ये जाऊन थांबण्याची सूचना त्यांनी केली. “सहा दिवसांत पाहुणे शोधा आणि हळूहळू मुंबईकडे निघा. 5 ते 50 लाख पोरं मुंबईत गेली पाहिजेत,” असं जरांगे म्हणाले.
12 ते 30 सप्टेंबरदरम्यान आंदोलनाची तयारी
जरांगेंनी 12 ते 30 सप्टेंबरदरम्यान मुंबईत उपोषणासाठी परवानगी मागण्याचं आवाहन समर्थकांना केलं आहे. परवानगी मिळाली किंवा नाही, तरी आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. “परवानगी दिली तरी उपोषण करणार, दिली नाही तरी करणार,” अशी भूमिका जरांगेंनी मांडली.
शिंदेंवरही निशाणा
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. मराठा आरक्षणाशी संबंधित नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला सवाल केला.
“58 लाख नोंदी आहेत तर मग आमच्याशी शिंदेंनी तीन वर्ष गद्दारी का केली?” असा सवाल जरांगेंनी केला. मराठा समाजाच्या हक्काच्या मुद्द्यांसाठी न्यायालयात का जावं लागतं, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, 12 सप्टेंबरला मुंबईत आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरू करण्याचा निर्धार जरांगेंनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मराठा आंदोलक मुंबईत कशा पद्धतीने दाखल होतात आणि सरकार या आंदोलनावर काय भूमिका घेतं, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

