ग्लासगो इथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतासाठी 31 जुलैचा दिवस ऐतिहासिक ठरला. ज्युडोमध्ये भारताने दोन गोल्ड ,मेडल्ससह तीन पदकांची कमाई केली, तर ॲथलेटिक्समध्ये तेजस्विन शंकरने अशी कामगिरी केली, जी भारताच्या स्पोर्ट्स हिस्टरी मध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. डेकाथलॉनमध्ये पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय प्लेयर ठरला आहे.

तेजस्विन शंकरने 10 कठीण क्रीडाप्रकारांचा समावेश असलेल्या डेकाथलॉन स्पर्धेत एकूण 7,976 पॉईंट्सची कमाई करत कांस्यपदक पटकावलं. विशेष म्हणजे, दुखापतीमुळे त्याला त्याच्या आवडीच्या आणि प्रमुख प्रकारात म्हणजेच हाय जंपमध्ये सहभागी होता आलं नव्हतं. पण, हार न मानता त्याने डेकाथलॉनमध्ये उतरायचं ठरवलं आणि इतिहासच घडवला.
10 प्रकार… 2 दिवस… आणि ऐतिहासिक पदक

डेकाथलॉन ही ॲथलेटिक्समधल्या सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक मानली जाते. या स्पर्धेत खेळाडूंना दोन दिवसांत 10 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये स्पर्धा करावी लागते. प्रत्येक प्रकारात मिळालेल्या गुणांची बेरीज करून फायनल रिझल्ट ठरवला जातो. शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या 1500 मीटर रेसनंतर तेजस्विनने एकूण 7,976 पॉईंट्सची कमाई केली आणि कांस्यपदक सुनिश्चित केलं. याबरोबरच डेकाथलॉनमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचं पदक जिंकणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला.
क्रिकेटर बनण्याचं स्वप्न… पण आयुष्याने वेगळी दिशा दिली

21 डिसेंबर 1998 ला दिल्लीमध्ये जन्मलेल्या तेजस्विन शंकरचं बालपण क्रिकेटच्या स्वप्नांनी भरलेलं होतं. पण, वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आयुष्यात मोठं संकट आलं. त्यानंतर दिल्लीतल्या सरदार पटेल विद्यालयात शिक्षण घेत असताना तिथल्या क्रीडा शिक्षकांनी त्याला ॲथलेटिक्समध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला. हा सल्लाच त्याच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तेजस्विनने 2.18 मीटर उंच उडी मारत हरिशंकर रॉय यांचा तब्बल 12 वर्षांचा राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे त्याला अमेरिकेतल्या कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटी इथे स्पोर्ट्स स्कॉलरशिप मिळाली. त्यानंतर 2018 मध्ये त्याने 2.29 मीटर उंच उडी मारत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम सुधारला. आजही हा विक्रम अबाधित आहे.
सलग दुसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास

तेजस्विन शंकरसाठी राष्ट्रकुल स्पर्धा ही इतिहास घडवण्याचं व्यासपीठ ठरतेय. 2022 च्या बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने हाय जंपमध्ये 2.22 मीटर उडी मारत कांस्यपदक जिंकलं होतं. त्या वेळी हाय जंपमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचं पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला होता. आता 2026 च्या ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने डेकाथलॉनमध्ये कांस्यपदक जिंकत आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. सलग दोन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारांत इतिहास रचण्याची ही दुर्मीळ कामगिरी आहे.
भारताच्या पदकसंख्येत भर

31 जुलैचा खेळ संपेपर्यंत भारताच्या खात्यात एकूण 23 पदकांची नोंद झाली आहे. ज्युडोमधल्या शानदार कामगिरीसोबतच तेजस्विन शंकरच्या ऐतिहासिक कांस्यपदकामुळे भारताच्या मेडलटॅलीला आणखी बळ मिळालं आहे. दुखापतीमुळे मुख्य स्पर्धा खेळता न आल्यावर अनेक खेळाडू निराश झाले असते. मात्र, तेजस्विन शंकरने परिस्थितीला संधीमध्ये बदललं आणि भारताला डेकाथलॉनमधलं पहिलं राष्ट्रकुल पदक मिळवून देत पुन्हा एकदा इतिहास रचला.

