NEET UG 2026 चा निकाल जाहीर झाल्यानंतर आता देशभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आता समुपदेशन म्हणजेच काउन्सेलिंग प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार आहे. मात्र, केवळ ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झाली म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित होत नाही. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाचे नियम आणि पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

पहिला नियम म्हणजे 12वीची पात्रता
विद्यार्थ्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा बायोटेक्नॉलॉजी आणि इंग्रजी विषयांसह 12वी उत्तीर्ण केलेली असावी. सर्वसाधारण आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना PCB विषयांमध्ये किमान 50 टक्के गुण आवश्यक आहेत. तर OBC, SC आणि ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान 40 टक्के गुणांची अट आहे.
दुसरा नियम आहे वयोमर्यादेचा
प्रवेशाच्या वर्षातील 31 डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्याचे वय किमान 17 वर्षे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. मात्र, NEET UG साठी सध्या कमाल वयोमर्यादा नाही.

तिसरा नियम म्हणजे वैद्यकीय तंदुरुस्ती
महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्याने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या वैद्यकीय शिक्षणासाठी तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
याशिवाय विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. देशातील कोणत्याही सरकारी किंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयात थेट प्रवेश घेता येत नाही. प्रवेशासाठी अधिकृत काउन्सलिंग प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य आहे. 15 टक्के अखिल भारतीय कोट्याच्या जागांसाठी MCC मार्फत, तर इतर जागांसाठी संबंधित राज्याच्या काउन्सलिंग प्रक्रियेद्वारे प्रवेश दिला जातो.
काउन्सलिंगच्या वेळी विद्यार्थ्यांनी 10वी-12वीची गुणपत्रके, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. बनावट कागदपत्रे आढळल्यास किंवा आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न केल्यास प्रवेश प्रक्रिया रद्द होऊ शकते.

