
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावर छापलेला वादग्रस्त राष्ट्रीय नकाशा हटवला जाणार नाही. नेपाळ सरकारने नाण्यावरील हा नकाशा काढून त्याजागी ऐतिहासिक बौद्ध मठाचे चित्र छापण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. या नकाशामध्ये भारतातील लिपुलेख, कालापाणी आणि लिम्पियाधुरा हे भाग नेपाळच्या हद्दीत दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे भारत आणि नेपाळमधील जुना सीमा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
नेपाळ राष्ट्र बँकेने एक रुपयाच्या नाण्याचे डिझाइन बदलण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यामध्ये वादग्रस्त नकाशाऐवजी अपर मुस्तांगमधील प्रसिद्ध लो घेकर मठाचे चित्र छापण्याची योजना होती. मात्र, नाण्यावरून राष्ट्रीय नकाशा हटवण्याच्या प्रस्तावाला विरोध झाला. यानंतर नेपाळच्या सरकारने नकाशा पूर्णपणे हटवण्याऐवजी नवीन डिझाइनमध्ये राष्ट्रीय नकाशासोबत लो घेकर मठाचाही समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत. सुधारित डिझाइनला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच नवीन नाण्यांची निर्मिती सुरू होईल.
लो घेकर मठ हा नेपाळमधील सर्वात जुन्या बौद्ध मठांपैकी एक मानला जातो. तो अपर मुस्तांगमध्ये आहे आणि त्याची स्थापना गुरु पद्मसंभव यांनी केल्याचे मानले जाते. या मठाला नाण्यावर स्थान देण्यामागे नेपाळच्या बौद्ध सांस्कृतिक वारशाला अधिक महत्त्व देणे आणि पर्यटनाला चालना देणे हा उद्देश आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये एक रुपयाचे नाणे तयार करण्यासाठी दोन रुपयांपेक्षा जास्त खर्च येतो. त्यामुळे नाण्याचे वजन आणि धातू बदलून उत्पादन खर्च कमी करण्याचाही विचार सुरू आहे.
नेपाळच्या 10 रुपयांच्या नाण्याचे डिझाइन बदलण्याचाही प्रस्ताव आहे. त्यावर दैलेखमधील 22 मंदिरांचा भुर्ति देवल मंदिर समूह दाखवला जाऊ शकतो.
भारत-नेपाळ सीमा वादाची सुरुवात 2020 मध्ये अधिक तीव्र झाली. नेपाळने त्यावेळी नवीन नकाशा जारी करून लिपुलेख, कालापाणी आणि लिम्पियाधुरा हे भाग आपल्या हद्दीत दाखवले. भारताने या दाव्याला विरोध केला असून, सीमा प्रश्न चर्चेतून सोडवला जावा, अशी भारताची भूमिका आहे.

