संसदेत आता स्मार्टवॉच, स्मार्ट चष्मे आणि पेन कॅमेरे वापरता येणार नाहीत. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच लोकसभा सचिवालयाने खासदारांसाठी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.
सोमवार, 20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी संसद परिसरात रेकॉर्डिंग किंवा फोटो-व्हिडिओ काढण्याची क्षमता असलेल्या स्मार्ट उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

यामागचं कारण म्हणजे संसदेची सुरक्षा आणि खासदारांची गोपनीयता. स्मार्टवॉच, स्मार्ट चष्मे किंवा पेन कॅमेरे यांसारखी उपकरणे नकळत किंवा जाणीवपूर्वक संवेदनशील माहिती रेकॉर्ड करू शकतात. त्यामुळे गोपनीय माहिती बाहेर जाण्याचा धोका वाढू शकतो. तसेच संसदीय विशेषाधिकारांचाही भंग होण्याची शक्यता आहे.
लोकसभा सचिवालयाने स्पष्ट केलं आहे की, संसद परिसरात अशा उपकरणांचा वापर सुरक्षा, गोपनीयता आणि संसदीय नियमांचं उल्लंघन होईल अशा पद्धतीने करू नये. यापूर्वीही अनधिकृत रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी काही खासदारांवर कारवाई झाल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे हा निर्णय अधिक कडकपणे लागू करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, अशाच प्रकारचा सल्ला डिसेंबर 2025 मध्येही देण्यात आला होता. मात्र आता पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्याची पुन्हा आठवण करून देण्यात आली आहे.
दरम्यान, 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात एकूण 19 बैठका होणार आहेत. या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये महिला आरक्षण, डेलिमिटेशन, वन नेशन वन इलेक्शन आणि इतर महत्त्वाच्या विधेयकांचा समावेश असू शकतो. तसेच विविध राजकीय मुद्द्यांवर सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा होण्याचीही शक्यता आहे. पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच स्मार्ट उपकरणांवर घालण्यात आलेली ही बंदी सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

