Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

‘बाई’ नावामागची गोष्ट.. विजया मेहता यांनी मराठी रंगभूमीला दिलेली नवी ओळख!

By Team Lagav Batti / July 2, 2026

मराठी रंगभूमीवर काही नावं ही फक्त कलाकार म्हणून नाही, तर एक अध्याय म्हणून ओळखली जातात. त्या नावांशिवाय मराठी नाट्यसृष्टीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही.. आणि त्यापैकीच एक नाव म्हणजे- विजया मेहता. म्हणजेच सगळ्यांच्या ‘बाई’.
पण ‘बाई’ हे नाव त्यांना कसं मिळालं? एका स्त्रीने मराठी रंगभूमीचा चेहरामोहरा कसा बदलला? नेमकं असं काय होतं त्यांच्या व्यक्तिमत्त्वात- की विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी यांच्यासह संपूर्ण नाट्यविश्व त्यांच्याविषयी अपार आदर बाळगत होतं? आणि रंगमंचावर स्वतःपेक्षा कलाकारांना मोठं करणारी ही दिग्दर्शिका नेमकी कोण होती? चला.. हे सगळं जाणून घेऊया

30 जून 2026… मराठी रंगभूमीवरून एक आवाज कायमचा शांत झाला. वयाच्या 92 व्या वर्षी विजया मेहता यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने केवळ एका दिग्दर्शिकेचं निधन झालं नाही.. तर मराठी नाट्यविश्वातल्या एका युगाचा पडदा पडला. पण काही व्यक्ती शरीराने जातात.. विचारांनी नाही. विजया मेहता त्यापैकीच एक. 4 नोव्हेंबर 1934 रोजी बडोदा इथे त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव होतं विजू जयवंत. घरात सगळ्यांची लाडकी ‘बेबी’. त्यांचे वडील दत्तात्रेय जयवंत हे -थिओसॉफिकल सोसायटीमध्ये अॅनी बेझंट यांचे सचिव म्हणून काम करत होते. पण विजू अगदी लहान असतानाच वडलांचं निधन झालं. आई ‘बायजी’ने त्यांना मोठ्या प्रेमाने, पण तितक्याच शिस्तीत वाढवलं. याच घरात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया रचला गेला. रॉयिस्ट विचारसरणी, स्वातंत्र्य चळवळीचं वातावरण, राष्ट्र सेवा दलाचा प्रभाव असल्याने विचार करण्याची सवय त्यांना लहानपणापासूनच लागली होती. विल्सन कॉलेजमध्ये राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचं शिक्षण सुरू होतं.


आणि तिथेच त्यांच्या आयुष्यातला पहिला मोठा गोड अपघात घडला.
एका कार्यक्रमात त्यांनी केलेलं वाचन प्राध्यापक वा. ल. कुलकर्णी यांच्या लक्षात आलं..आणि त्यांनी सहज सांगितलं की “तू नाटकात काम कर.”.. हा सल्ला कदाचित त्या क्षणी साधा वाटला असेल.
पण पुढे तो मराठी रंगभूमीच्या इतिहासाला दिशा देणारा ठरला.
नंतर विजया मेहता अनेकदा म्हणायच्या..”अपघात घडतच असतात… पण ते पकडणं हे आपल्या हातात असतं.” भारतीय विद्या भवन..,मुंबई मराठी साहित्य संघ..-इथून त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला. प्रेक्षक टाळ्या वाजवत होते, भूमिका मिळत होत्या, -पण विजू जयवंत फक्त अभिनेत्री होऊन थांबणाऱ्या नव्हत्या. त्यांना रंगमंचाच्या पडद्यामागचं जग समजून घ्यायचं होतं. आणि त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात आले- इब्राहिम अल्काझी. भारतीय रंगभूमीतलं एक अजरामर नाव. त्यांच्याकडे प्रशिक्षण घेणं म्हणजे फक्त अभिनय शिकणं नव्हतं. ती होती स्वतःला घडवण्याची शाळा. शिस्त..वेळेचं भान..संवादामागचा अर्थ आणि रंगमंचाकडे केवळ मनोरंजन म्हणून नाही, तर जबाबदारी म्हणून पाहण्याची दृष्टी. अल्काझींकडे प्रशिक्षण घेत असताना ना एक नियम होता- l’त्या काळात मराठी नाटकात काम करायचं नाही.’ पण या एका वर्षात विजू जयवंत यांच्यातली अभिनेत्रीच नाही,,तर दिग्दर्शिकाही जन्माला येत होती. पुढे आयुष्यभर त्यांच्या तालमींमध्ये अल्काझींची शिस्त दिसून आली.


यानंतर नाट्यक्षेत्राशी संबंधित सरकारी शिष्यवृत्तीमुळे त्यांना आणखी दोन मोठे गुरू लाभले- अदी मर्झबान आणि दुर्गाबाई खोटे. ‘इंडियन अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स’मध्ये शिक्षण घेताना पहिल्या वर्षी त्यांचा अभिनयावर भर होता..पण दुसऱ्या वर्षी दुर्गाबाई खोटे यांनी विजू यांना एक वेगळाच सल्ला दिला. “तू दिग्दर्शन कर. हा निर्णय सोपा नव्हता. त्या काळात -स्त्रिया- दिग्दर्शक म्हणून फारशा दिसत नव्हत्या. पण दुर्गाबाईंना विजूमधली ती क्षमता कदाचित दिसली असावी. अदी मर्झबान यांनीही त्यांना एक महत्त्वाचा धडा दिला होता.
ते म्हणाले होते.. “दिग्दर्शकाने कलाकाराला उडायला शिकवायचं.. दोरीने ओढत ठेवायचं नाही.” हा विचार विजया मेहतांच्या संपूर्ण कारकिर्दीचा पाया ठरला. दरम्यान, दुर्गाबाई खोटे यांच्या मुलाशी- ‘हरीन खोटे’ यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आणि मग विजू जयवंत….विजया खोटे झाल्या. लग्नानंतर त्या जमशेदपूरला गेल्या.
तिथेही त्यांनी मराठी माणसांना एकत्र करून नाटक बसवलं.


पण त्यांचं मन मात्र तिथे रमलं नाही. रंगमंचापासून दूर राहणं त्यांना अशक्य होतं. ही गोष्ट त्यांच्या कुटुंबालाही समजली..आणि पती हरीन खोटे तसंच सासू दुर्गाबाई खोटे यांच्या पाठिंब्यामुळे त्या पुन्हा मुंबईत परतल्या. कदाचित….हा निर्णय झाला नसता.. तर मराठी रंगभूमीलाही विजया मेहता मिळाल्या नसत्या.
मुंबईत परतल्यानंतर- त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा अध्याय सुरू झाला. 1960 साल. विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, डॉ. श्रीराम लागू आणि काही समविचारी रंगकर्मी एकत्र आले. उद्देश एकच…-
मराठी रंगभूमीला नवी दिशा द्यायची. ज्यातून जन्म झाला-‘रंगायन’चा.
बरं रंगायन ही फक्त संस्था नव्हती. ती एक चळवळ होती. प्रयोगशीलता, नवीन विषय, सामाजिक भान आणि प्रेक्षकांशी थेट संवाद.. या सगळ्यामुळे रंगायनने मराठी रंगभूमीत एक वेगळीच क्रांती घडवली. स्वतः विजया मेहता नंतर म्हणाल्या होत्या की


“रंगायन ही संस्था नव्हती. ते एक स्पंदन होतं.” विजयाबाई आणि विजय तेंडुलकर या जोडीने अनेक दर्जेदार नाटकं दिली. यातलं पहिलं नाटक होतं कुमारी मातांचा नाजूक विषय हाताळणारं ‘श्रीमंत’. यावेळी राज्य नाट्यस्पर्धेसाठी 21 वर्षांची विजया आपल्यापेक्षा वयाने मोठ्या संचाला दिग्दर्शित करणार होती. संचातले अनेक जण त्यांना ‘विजू’च म्हणायचे. विजय तेंडुलकरांनी मात्र ‘विजू’ ऐवजी ‘बाई’ असं आदरार्थी संबोधन वापरलं आणि हे बिरुद कायमचं त्यांच्यासोबत राहिलं..आणि मग संपूर्ण मराठी रंगभूमी त्यांना ‘बाई’ म्हणून ओळखायला लागली. पण बर्‍याच जणांना उत्सुकता आहे की ‘बाई’ इतक्या मोठ्या कशा झाल्या? तर त्याचं उत्तर त्यांच्या दिग्दर्शनाच्या पद्धतीत दडलं होतं. त्या कलाकारांना अभिनय करून दाखवत नसत. त्या त्यांना पात्र समजावून सांगायच्या..प्रश्न विचारायच्या..पात्र चालतं कसं..,बोलतं कसं..,विचार करतं कसं..,हे कलाकारांनी स्वतः शोधावं, असा त्यांचा आग्रह असायचा. त्या म्हणायच्या- “प्रयोग हा अभिनेता आणि अभिनेत्रीचा असतो. दिग्दर्शकाचा नाही. मी दिशा दाखवू शकते.. पण चालायचं त्यांनाच असतं.” अदी मर्झबान यांनी दिलेला एक धडा त्यांनी आयुष्यभर जपला.”दिग्दर्शकाने कलाकाराला भरारी घ्यायला शिकवायचं… त्याला कळसूत्री बाहुलं बनवायचं नाही.” आणि म्हणूनच त्यांच्या हातून घडलेले कलाकार हे फक्त चांगले अभिनेते नव्हते, तर स्वतःचा विचार करणारे कलाकार होते. विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी..असे कितीतरी कलाकार आजही अभिमानाने सांगतात की


“आम्ही बाईंकडे शिकलो.” पण रंगमंचावर इतरांना उभं करणाऱ्या या स्त्रीची स्वतःची परीक्षा अजून बाकी होती. लग्नाला अवघी काही वर्षं झाली होती. दोन लहान मुलं.. आणि अचानक पती हरीन खोटे यांचं अकाली निधन झालं. ज्या खांद्यावर संसाराची स्वप्नं विसावली होती, तोच खांदा अचानक निसटला. याच काळात ‘रंगायन’मध्येही मतभेद झाले. ज्या संस्थेसाठी त्यांनी जीव ओतला तीही अखेर बंद पडली. एका बाजूला वैयक्तिक दुःख, दुसऱ्या बाजूला आयुष्याचं स्वप्न तुटण्याची वेदना..कोणतीही व्यक्ती इथे थांबली असती. पण -विजया मेहता थांबल्या नाहीत. कारण त्यांच्या आयुष्यात आणखी एक गोष्ट कायम होती..ती म्हणजे- पुन्हा उभं राहण्याची जिद्द. याच काळात त्यांच्या आयुष्यात आले फरोख मेहता. एक ओळख- जी पुढे आयुष्याची साथ ठरली. फरोख मेहता यांनी केवळ त्यांचा स्वीकार केला नाही,,तर त्यांच्या दोन मुलांनाही तितक्याच प्रेमाने स्वीकारलं.
विजया खोटे- मग -विजया मेहता बनल्या. त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. आणि याच काळात त्यांना परदेशात काम करण्याची मोठी संधी मिळाली. लंडन, जर्मनी, पोलंड…..भारतीय रंगभूमीचा प्रवास आता जगभर पोहोचत होता. परदेशात गेल्यावर त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. पाश्चात्त्य रंगभूमी समजून घेत असताना आपली भारतीय रंगपरंपरा किती समृद्ध आहे याची नव्याने जाणीव झाली. त्यांनी भारतीय शैलीत अनेक प्रयोग केले. तमाशाची शैली, लोकनाट्याची ऊर्जा, भारतीय कथनपद्धती- यांचा वापर करून त्यांनी परदेशी प्रेक्षकांनाही भारावून टाकलं.

‘अजब न्याय वर्तुळाचा’-
हे त्यांचं एक महत्त्वाचं नाटक. जर्मनीमध्ये या नाटकाचे प्रयोग झाले.
भाषा वेगळी, देश वेगळा, संस्कृती वेगळी पण रंगमंचावरची भावना..-
ती मात्र सगळ्यांना समजली. प्रयोग संपल्यानंतर जवळपास- पंधरा मिनिटं- प्रेक्षक टाळ्या वाजवत उभे राहिले……हा सन्मान- केवळ विजया मेहतांचा नव्हता- तर तो मराठी रंगभूमीचाही होता. यानंतर ‘मला उत्तर हवंय’, ‘जास्वंदी’, ‘अखेरचा सवाल’, ‘हमीदाबाईची कोठी’ अशी एकापेक्षा एक नाटकं त्यांनी रंगभूमीला दिली. त्यांच्या प्रत्येक नाटकात विषय वेगळा होता पण माणूस केंद्रस्थानी होता. 1988 ते 1992 या काळात त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळली. पुढे मुंबईतील NCPAच्या संचालक म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. देशभरातल्या नव्या पिढीच्या कलाकारांना त्यांनी घडवलं.. आणि रंगभूमीपुरतंच त्यांचं काम मर्यादित राहिलं नाही. ‘रावसाहेब’, ‘पेस्तनजी’, ‘स्मृतिचित्रे’ यासारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. ‘पार्टी’ चित्रपटातला त्यांचा अभिनयही विशेष गाजला. तर.. ‘झिम्मा’ हे त्यांचं आत्मचरित्र- आजही अनेक कलाकारांसाठी प्रेरणेचं पुस्तक मानलं जातं.. सोबतंच


त्यांच्या कार्याचा गौरवही तितक्याच मोठ्या पुरस्कारांनी झाला.
1975 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार,  यानंतर.. पद्मश्री.., ‘स्मृतिचित्रे’ला उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार., ‘पेस्तनजी’ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार. ‘रावसाहेब’साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार..हे पुरस्कार त्यांच्या कार्याची दखल होते. पण कदाचित त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे त्यांच्याकडून घडलेले कलाकार.
विक्रम गोखले म्हणाले होते..”बाईंनी आम्हाला कधी अभिनय करून दाखवला नाही. त्या आम्हाला विचार करायला शिकवायच्या.”
आणि.. नाना पाटेकरांनी तर त्यांच्याबद्दल एक अतिशय सुंदर आठवण सांगितली होती. ते म्हणाले.. “आम्ही चालायला शिकत होतो, तेव्हा आमच्या मुठीत बाईंचं बोट होतं. त्यांनी आम्हाला पडू दिलं नाही. आणि जेव्हा आम्ही स्वतः चालायला लागलो.. तेव्हा त्यांनी अलगद हात सोडला.”


विजया मेहता अनेकदा आपल्या आयुष्यातल्या तीन स्त्रियांचा उल्लेख करायच्या. त्यांची आई, पहिल्या सासूबाई दुर्गाबाई खोटे आणि दुसऱ्या सासूबाई बापाईजी. या तिघींनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच आपण इतकं काम करू शकलो असं त्या म्हणत.. यश मिळालं, पुरस्कार मिळाले, जगभर नाव झालं पण पाय मात्र कायम जमिनीवरच राहिले.. आणि अखेर 30 जून 2026 रोजी
‘बाई’ काळाच्या पडद्याआड गेल्या. पण खरंच.. अशा व्यक्ती कधी जातात का???? ते प्रत्येक कलाकाराच्या संवादात जिवंत असतात.
प्रत्येक तालमीत जिवंत असतात. प्रत्येक पडदा उघडताना आणि प्रत्येक पडदा पडताना ते कुठेतरी असतातच. कारण काही माणसं नाटकं लिहितात..काही नाटकं करतात..आणि काही..? संपूर्ण रंगभूमीच घडवतात. विजया मेहता..-या त्या तिसऱ्या प्रकारातल्या होत्या. ‘बाई’ गेल्या..पण त्यांनी उजळवलेला रंगमंच आणि त्यांनी घडवलेली कलाकारांची पिढी मराठी रंगभूमीवर कायम प्रकाश देत राहील.

Previous

विजया मेहता यांचं निधन; मराठी रंगभूमीच्या ‘बाईं’चा प्रेरणादायी प्रवास…

Next

मराठवाडा मध्यरात्री हादरला! हिंगोली जिल्ह्यात 3.6 रिश्टर तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये भीती,,,

Related Posts

Priyanka Chopra: प्रियंका म्हणतेय.. पती असावा तर निक जोनससारखा…

Priyanka Chopra: प्रियंका म्हणतेय.. पती असावा तर निक जोनससारखा…

Leave a Comment / मनोरंजन / By Team Lagav Batti
जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते अमिताभ बच्चन, बाळासाहेब धावून आले होते…

जेव्हा मृत्यूशी झुंज देत होते अमिताभ बच्चन, बाळासाहेब धावून आले होते…

Leave a Comment / मनोरंजन, राजकारण / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top