दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर आणि श्रद्धा कपूरचा बहुप्रतिक्षित ‘ईठा’ सिनेमा सध्या प्रचंड चर्चेत आहे. टीझर रिलीज होताच श्रद्धा कपूरचा लूक, तिची बॉडी लँग्वेज आणि तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण, दुसऱ्या बाजूला या सिनेमाभोवतीचा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आधी सिनेमाच्या नावावरून राजकीय स्तरावर विरोध झाला आणि आता स्वतः विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनीही निर्मात्यांवर गंभीर आक्षेप घेत मोठ्या मागण्या केल्या आहेत. विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, विठाबाईंसारख्या महान लोककलावंतावर सिनेमा बनत असल्याचा त्यांना अभिमान आहे, मात्र इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये कुटुंबीयांशी कोणताही संपर्क न साधणं आणि त्यांना विश्वासात न घेणं हे दुर्दैवी आहे.

विठाबाईंचे सुपुत्र कैलास नारायणगावकर यांनी सांगितलं की, त्यांना या सिनेमाबद्दल आठवडाभरापूर्वी माहिती मिळाली. टीझर पाहिल्यानंतर त्यामध्ये त्यांचा जन्म स्टेजच्या मागे झाल्याचं दाखवण्यात आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणाले की, आईचा संघर्ष आणि आयुष्य मोठ्या पडद्यावर दाखवलं जातंय ही आनंदाची बाब असली, तरी याआधी निर्मात्यांनी आमच्याशी चर्चा केली असती तर आम्ही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगू शकलो असतो आणि त्यामुळे सिनेमा जास्त वास्तववादी झाला असता. सिनेमाच्या नावावरून सुरू झालेल्या वादावरही कुटुंबीयांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ग्रामीण भागात विठाबाईंना प्रेमाने ‘ईठा’ म्हटलं जात असेल, हे मान्य असलं तरी त्यांचं खरं आणि ऐतिहासिक नाव ‘विठाबाई नारायणगावकर’ हेच आहे, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. नव्या पिढीला त्यांचा इतिहास आणि वारसा योग्य नावातूनच समजला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

विठाबाईंचे नातू मोहित नारायणगावकर यांनी तर सिनेमाच्या शीर्षकात बदल करण्याची थेट मागणी केली आहे. त्यांच्या मते, महाराष्ट्रातील लोककलावंतांच्या नावासोबत गावाचं नाव जोडलेलं असतं आणि तीच त्यांची खरी ओळख असते. त्यामुळे ‘ईठा’ हे नाव बदलून ‘विठा’ करण्यात यावं आणि त्यासोबत ‘नारायणगावकर’ हे नाव स्पष्टपणे वापरण्यात यावं, अशी त्यांची मागणी आहे. यासंदर्भात त्यांनी निर्मात्यांना मेलद्वारे दोन ते तीन सूचना पाठवल्याचंही सांगितलं.

पण हा वाद फक्त नावापुरता मर्यादित नाहीये. कुटुंबीयांनी सिनेमाच्या कथानकावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांच्या मते, चित्रपटासाठी वापरण्यात आलेल्या काही संदर्भांमध्ये तथ्यात्मक चुका आहेत. विशेषतः विठाबाईंच्या आयुष्यावर आधारित असल्याचा दावा करणाऱ्या एका पुस्तकामधील अनेक गोष्टी चुकीच्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्या पुस्तकातील जवळपास पन्नास टक्के माहिती ही ऐकीव स्वरूपाची आणि वास्तवाशी विसंगत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याशिवाय, तमाशा फडाच्या नावावरूनही त्यांनी आक्षेप घेतला आहे. विठाबाईंच्या काळातील मूळ फडाचं नाव ‘भाऊ बापू नारायणगावकर’ असं होतं. मात्र टीझरमध्ये ‘भाऊ गावकर’ असं नाव दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे ‘गावकर’ नेमकं कोण, हा प्रश्न उपस्थित होतो आणि ‘नारायणगावकर’ हे नाव वगळून इतिहास अपूर्ण राहतो, असं मोहित नारायणगावकर यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.

दरम्यान, कुटुंबीयांनी दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं आहे. मेलद्वारे सूचना पाठवूनही अद्याप त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता त्यांनी निर्मात्यांना थेट अल्टिमेटम दिला आहे. २ ते ३ जुलैपर्यंत निर्मात्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि सिनेमा आम्हाला दाखवला तर आम्ही त्याचं स्वागत करू. पण जर संपर्क झाला नाही आणि सिनेमात आक्षेपार्ह किंवा चुकीच्या गोष्टी आढळल्या, तर आम्ही नक्कीच कायदेशीर मार्ग अवलंबू,” असा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे. यासाठी उच्च न्यायालयातील वकिलांशी चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, कुटुंबीयांचा सिनेमाला विरोध नाही. उलट विठाबाईंचं आयुष्य आणि संघर्ष देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा अशीच त्यांची इच्छा आहे. मात्र, ते करताना इतिहास, नाव आणि वारशाशी कोणतीही तडजोड होऊ नये, एवढीच त्यांची अपेक्षा आहे.


