देशभरातून लाखो भाविक ज्या शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येतात, त्या शिर्डीत आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशातील उज्जैन येथील दोन अल्पवयीन मुलांना पळवून आणून त्यांच्याकडून भीक मागवणे आणि कचरा गोळा करण्याचं काम करून घेतलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिर्डीत बालतस्करीचं मोठं रॅकेट सक्रिय आहे का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही दोन्ही मुलं सुमारे पंधरा दिवसांपूर्वी शिर्डीत आणण्यात आली होती. रात्री उशिरा ही मुलं संशयास्पद परिस्थितीत कचरा गोळा करताना आढळली. त्यानंतर मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशनचे डॉक्टर एलम यांनी तत्काळ हस्तक्षेप करत या मुलांना सुरक्षित ताब्यात घेतलं. यानंतर मुलांना शिर्डीतील एका आश्रमात ठेवण्यात आले असून पोलिसांच्या मदतीनं त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. विशेष म्हणजे, या मुलांच्या कुटुंबीयांनी मध्यप्रदेशात मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार आधीच दाखल केली होती. या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बाहेरच्या राज्यातून मुलांना शिर्डीत आणलं जात आहे का? भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत मुलांकडून भीक मागवली जातेय का? आणि यामागे एखादं मोठं रॅकेट कार्यरत आहे का?दरम्यान, या प्रकरणानंतर पोलिस प्रशासन, महिला व बालविकास विभाग आणि बालकल्याण समितीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


