आयपीएल 2027 च्या मिनी ऑक्शनपूर्वी बेन स्टोक्सच्या नावामुळे एक नवी चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलच्या नियमानुसार, एखाद्या खेळाडूने आधीच्या मेगा ऑक्शनमध्ये आपलं नाव दिलं नसेल, तर त्याला पुढच्या मिनी ऑक्शनमध्ये सहभागी होता येत नाही. अशा खेळाडूला पुढच्या मेगा ऑक्शनपर्यंत म्हणजेच तीन वर्षं आयपीएलपासून दूर राहावं लागू शकतं. मात्र, बेन स्टोक्सच्या बाबतीत हा नियम बदलल्याचं दिसत आहे.

स्टोक्सने 2024 च्या मेगा ऑक्शनसाठी आपलं नाव नोंदवलं नव्हतं. तरीही त्याला आगामी 2027 मिनी ऑक्शनसाठी नोंदणी करण्याची परवानगी मिळाली आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, स्टोक्सने ऑक्शनसाठी आपलं नाव दिलं असून त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, स्टोक्सने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे तो पुन्हा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार का, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
बांगलादेशचे 12 खेळाडू ऑक्शनमध्ये

आगामी ऑक्शनसाठी बांगलादेशच्या 12 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये हसन महमूद, परवेझ हुसेन इमॉन, रिशाद हुसेन, तस्कीन अहमद, शोरफुल इस्लाम आणि तौहीद हृदोय यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, मुस्तफिजुर रहमान आणि शाकिब अल हसन यांची नावं या यादीत नाहीत.
मागील सीझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने मुस्तफिजुरला ऑक्शनमध्ये खरेदी केलं होतं. मात्र, बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचारांच्या बातम्यांनंतर त्याला सीझन सुरू होण्याआधीच टीममधून रिलीज करण्यात आलं होतं.
ऑक्शनमध्ये 1220 खेळाडूंची नावं

रिपोर्टनुसार, आगामी मिनी ऑक्शनसाठी एकूण 1220 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये 939 भारतीय आणि 281 विदेशी खेळाडू आहेत. मात्र, सर्व 10 टीम्सकडे मिळून फक्त 66 खेळाडूंच्या जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे ऑक्शनमध्ये खेळाडूंना टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी चांगलीच स्पर्धा करावी लागणार आहे.
ऑक्शन 16 डिसेंबर रोजी गोव्यात होणार आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडूवर मोठी बोली लागते आणि कोणत्या टीमला आपल्या गरजेनुसार खेळाडू मिळतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

