शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून स्वतंत्र भूमिका मांडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच आता त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेगाव ते नागपूर असा ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मात्र, या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव, चिन्ह किंवा झेंडा वापरणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

४ ते ९ डिसेंबरदरम्यान ट्रॅक्टर मोर्चा
शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह १३ मुद्दे मांडले होते. याच मुद्द्यांना पुढे घेऊन रोहित पवार ४ डिसेंबर रोजी शेगाव येथून ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात करणार आहेत. हा मोर्चा ९ डिसेंबर रोजी नागपुरात पोहोचणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा या आंदोलनाचा उद्देश असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं.
पक्षाचं चिन्ह आणि झेंडा का वापरणार नाहीत?
आंदोलनात पक्षाचं नाव, चिन्ह किंवा झेंडा वापरणार नसल्याबाबत रोहित पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही आंदोलन करताना सामाजिक विचार समोर ठेवतो. त्यामुळे पक्षाचं चिन्ह किंवा नाव वापरत नाही, असं ते म्हणाले. पुण्यात झालेलं एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन असो किंवा पंढरपुरातील शेतकऱ्यांचं आंदोलन, या ठिकाणीही पक्षाचं चिन्ह वापरलं नव्हतं. कारण हे विषय मोठे असून त्यात राजकारण येऊ नये, असा आमचा प्रयत्न असतो. आंदोलनात पक्षाचं चिन्ह वापरल्यास त्याला राजकीय रंग दिला जाऊ शकतो. त्यामुळे नागपूरच्या ट्रॅक्टर मोर्चातही पक्षाचं चिन्ह वापरणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत देण्याची मागणी
राज्यातील दुष्काळी परिस्थिती १९७२ च्या दुष्काळापेक्षाही गंभीर असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील मुद्देच या मोर्चाच्या माध्यमातून पुढे मांडले जाणार आहेत. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं, यासाठी पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरणार नसल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं.
रोहित पवारांच्या आंदोलनाला पक्षाचा विरोध नाही
दरम्यान, रोहित पवार पक्षापासून वेगळी भूमिका घेत असल्याच्या चर्चा सुरू असताना त्यांच्या आंदोलनाला पक्षातून पाठिंबा मिळणार की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. रोहित पवार यांना स्वतंत्रपणे आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र, पक्षाचं चिन्ह आणि झेंडा वापरायचा असल्यास त्याला व्यापक स्वरूप प्राप्त होईल आणि त्यासाठी पक्षांतर्गत चर्चा होणं आवश्यक आहे, असं शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं. तसेच रोहित पवारांच्या आंदोलनाला पक्षाचा विरोध नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे रोहित पवारांचा हा ट्रॅक्टर मोर्चा केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीच आहे की त्यामागे काही राजकीय संदेशही आहे, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

