दिल्लीतील ‘जंतरमंतर 2.0’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुमारे २५ हजार पोलीस आणि निमलष्करी जवान, ३०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, ठिकठिकाणी बॅरिकेड्स आणि वाहनांची तपासणी सुरू आहे. CJP चे संस्थापक अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि प्रवक्ते सौरव दास यांना विमानातूनच ताब्यात घेण्यात आलं. यूट्यूबर ध्रुव राठी यांनाही गुरुग्राममधील घरातून ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.

२५ हजार जवान, ३७ ठिकाणी नाकाबंदी
दिल्ली पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यापक बंदोबस्ताचं नियोजन केलं आहे. नवी दिल्ली जिल्ह्यात ३७ ठिकाणी नाकाबंदीची व्यवस्था करण्यात आली असून, आंदोलकांना ताब्यात ठेवण्यासाठी स्वतंत्र केंद्रं तयार करण्यात आली आहेत. जंतरमंतरकडे जाणाऱ्या मार्गांवर सात स्तरांचं बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. जंतरमंतर, जनपथ, निवडणूक आयोगाचं कार्यालय आणि दिल्ली पोलीस मुख्यालय परिसराला संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. या परिसरातील सुमारे दीड किलोमीटरच्या पट्ट्यात ६,५०० हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचं नियोजन आहे.
आंदोलनामागची नेमकी मागणी काय?

CJP कडून १० ऑक्टोबर रोजी जंतरमंतरवर आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची (SIR) प्रक्रिया स्थगित करावी, अशा मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या आहेत.
मात्र, दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली. आंदोलनासाठी अर्ज नियोजित तारखेच्या किमान दहा दिवस आधी सादर करणे आवश्यक असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अर्ज उशिरा दाखल झाल्यामुळे तसेच वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेच्या संभाव्य प्रश्नांमुळे परवानगी नाकारण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
४५ मेट्रो स्थानकं बंद; रेल्वे सेवांवर परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही निर्बंध
सुरक्षा व्यवस्थेचा परिणाम राजधानीतील वाहतुकीवरही होण्याची शक्यता आहे. जंतरमंतर, जनपथ, कनॉट प्लेस आणि आसपासच्या महत्त्वाच्या मार्गांवर वाहनांची तपासणी आणि वाहतूक वळवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागू शकतो. मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारांवरही सुरक्षा तपासणी वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रोच्या ४५ स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद केले आहेत. १० ऑक्टोबर रोजी सकाळी ४ ते दुपारी २ या वेळेत २५४ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहे. यामध्ये ७५ मेल-एक्स्प्रेस आणि १७९ लोकल गाड्यांचा समावेश होता.
CJP चा पोलिसांवर आरोप

दुसरीकडे, CJP कडून समर्थकांना आंदोलनस्थळी पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार हिरावून घेतला जात असल्याचंही संघटनेचं म्हणणं आहे. मात्र, पोलिसांनी वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कारणावरून परवानगी नाकारल्याची भूमिका मांडली आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या, कडक सुरक्षा व्यवस्था आणि वाहतुकीवरील संभाव्य निर्बंध यामुळे ‘जंतरमंतर 2.0’ आंदोलन चर्चेत आलं आहे. आता आंदोलनाच्या मागण्यांवर प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल आणि आंदोलक या निर्णयाला कसा प्रतिसाद देणार, याकडे लक्ष लागलं आहे.

