अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील आंबेगावातील एका अंगणवाडी सेविकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अंगणवाडीत येणारा वाटाणा आणि इतर कच्चा माल निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप सेविकेने व्हिडीओद्वारे केला होता. या प्रकारानंतर आहाराच्या गुणवत्तेऐवजी सेविकेवरच कारवाई झाल्याने आता या प्रकरणावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अंगणवाडी सेविकेने नेमकी काय तक्रार केली?
पुण्याच्या आंबेगावातील अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी मिळणाऱ्या कच्च्या मालाच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, अंगणवाडीत भरडा, साखर, मूगडाळ, हळद, मीठ, मिरची यासह विविध साहित्य पुरवले जाते. मात्र यातील पांढरा वाटाणा अनेक वेळा कुकरमध्ये 9 ते 10 शिट्ट्या झाल्यानंतरही व्यवस्थित शिजत नसल्याचा दावा त्यांनी केला. वाटाणा शिजत नसल्यामुळे मुलांना तो खाण्यात अडचण येते आणि काही मुलांच्या पोटदुखीच्या तक्रारीही होत असल्याचे त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितले. भरड्याबाबतही त्यांनी अशाच प्रकारची तक्रार केली.
‘मुलांना असा आहार कसा द्यायचा?’

देवयानी पारधी यांनी व्हिडीओमध्ये प्रशासनाला या साहित्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याची विनंती केली होती. कमी प्रमाणात साहित्य मिळाले तरी चालेल, मात्र ते चांगल्या दर्जाचे असावे, अशी त्यांची मागणी होती. अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना चांगला आणि पौष्टिक आहार मिळावा, यासाठीच आपण हा मुद्दा मांडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निकृष्ट आहारामुळे बालकांचे पोषण आणि आरोग्य प्रभावित होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
तुकाराम मुंढेंकडेही केली होती मागणी
अन्न भेसळीविरोधात कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडेही पारधी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून लक्ष घालण्याची विनंती केली होती. अंगणवाड्यांमध्ये बालकांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेचीही तपासणी करण्यात यावी आणि निकृष्ट दर्जाचा आहार पुरवला जात असल्यास त्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
तक्रारीनंतर सेविकेवरच निलंबनाची कारवाई
या व्हिडीओनंतर संबंधित प्रशासनाकडून देवयानी पारधी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्यांनी आपण मुलांना चांगला आहार मिळावा या उद्देशानेच प्रश्न उपस्थित केला होता, मग आपली चूक काय? असा सवाल केला आहे. ‘मुलांच्या आहाराबाबत प्रश्न विचारला म्हणून माझ्यावर कारवाई का?’असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी न्यायाची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही कारवाईवर टीका

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विकास लवांडे यांनीही प्रतिक्रिया देत प्रशासनाच्या कारवाईवर टीका केली आहे. बालकांना दिल्या जाणाऱ्या आहाराचा दर्जा सुधारण्याची मागणी करणाऱ्या सेविकेवर कारवाई करण्याऐवजी निकृष्ट आहारासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी आणि पुरवठादारांची चौकशी व्हायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली. बालकांच्या पोषणासाठी उपलब्ध होणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी आणि सेविकेवरील निलंबन मागे घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता, त्याची तपासणी आणि तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता प्रशासन या आरोपांची चौकशी करून नेमकी वस्तुस्थिती काय समोर आणते, याकडे लक्ष लागले आहे.

