
महाराष्ट्रातील कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे सध्या अन्न व औषध प्रशासन विभागातील कारवायांमुळे चर्चेत आहेत. भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सुरू असलेल्या कारवाईमुळे त्यांना नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीने तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ अनोखा निर्णय घेतला आहे.
घराघरात तुकाराम मुंढेंचा फोटो लावण्याचे आवाहन
मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा ग्रामपंचायतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामस्थांना एक विशेष आवाहन केले आहे. तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांच्या समर्थनार्थ प्रत्येक घरात त्यांचा फोटो लावावा, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने तुकाराम मुंढे यांच्या फोटोचे अनावरणही करण्यात आले. त्यानंतर आता गावातील प्रत्येक घरात त्यांचा फोटो लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भेसळखोरांवरील कारवाईमुळे चर्चेत
तुकाराम मुंढे यांनी FDA अर्थात अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी कारवाया सुरू आहेत. अन्नपदार्थांमधील भेसळ, नियमांचे उल्लंघन आणि इतर गैरप्रकारांविरोधात कारवाई केली जात आहे. या कारवायांमुळे नागरिकांमध्ये तुकाराम मुंढे यांच्या कामाची चर्चा असून, त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.
बदलीच्या चर्चेदरम्यान ग्रामस्थांचा पाठिंबा
तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत अनेकदा त्यांच्या बदल्या झाल्या आहेत. विविध विभागांमध्ये काम करताना त्यांनी शिस्त आणि कडक कारवाईसाठी आपली वेगळी ओळख निर्माण केली. दरम्यान, FDA मधील त्यांच्या कामाच्या पद्धतीवर काही कर्मचाऱ्यांकडून आक्षेप घेतल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कु-हा ग्रामपंचायतीने तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ घेतलेला निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.

