
तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता नवं वळण मिळालं आहे. विजय यांच्या पत्नी संगीता यांनी दाखल केलेली घटस्फोटाची याचिका आता मागे घेतली आहे. शुक्रवारी, 7 ऑगस्ट रोजी चेंगलपट्टू येथील न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान संगीता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा खटला पुढे चालवायचा नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर न्यायालयाने घटस्फोटाची याचिका मागे घेत प्रकरण निकाली काढलं.
घटस्फोटाची याचिका अचानक मागे का?
विजय आणि संगीता यांच्या नात्यात काही काळापासून दुरावा असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांना त्यावेळी अधिकृत स्वरूप मिळालं, जेव्हा संगीता यांनी चेंगलपट्टू न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केल्याचं समोर आलं. मात्र, आता या प्रकरणात अचानक मोठा बदल झाला आहे. 7 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान संगीता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर आपली बाजू मांडली. त्यांना हे प्रकरण पुढे चालवायचं नसल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयाने त्यांची याचिका मागे घेतल्याचं मान्य करत प्रकरण बंद केलं. संगीता यांनी याचिका मागे घेण्यामागचं कारण न्यायालयाला सांगितल्याचं वृत्त आहे. मात्र, या कारणाचा सविस्तर तपशील अजून सार्वजनिक झालेला नाही.
विजय यांच्यावर गंभीर आरोप
घटस्फोटाच्या याचिकेत संगीता यांनी विजय यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विजय यांचे एका अभिनेत्रीशी कथित विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 2021 मध्ये आपल्याला या कथित नात्याची माहिती मिळाल्याचा दावा संगीता यांनी केला होता. विजय यांनी हे नातं संपवण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यानंतरही ते सुरू होतं असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. यामुळे आपल्याला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचंही संगीता यांनी म्हटल्यालं होतं. याशिवाय विजय हळूहळू कुटुंबापासून दूर गेले, तसंच आपल्याला भावनिक आणि इतर प्रकारचं सहकार्य मिळत नसल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं.
कधी झाली होती दोघांची भेट?
विजय आणि संगीता यांचं नातं अनेक वर्षांपासून आहे. दोघांचा विवाह 1999 मध्ये झाला होता. त्यांना दोन मुलं आहेत. मुलगा जेसन संजय आणि मुलगी दिव्या साशा अशी त्यांची नावं आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत संगीता विजय यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये दिसत होत्या. मात्र, त्यानंतर त्या सार्वजनिकरित्या कमी दिसू लागल्याने दोघांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.
अफवांनंतर कोर्टात प्रकरण
विजय आणि संगीता यांच्या नात्याबाबत अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. मात्र, दोघांकडूनही याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. घटस्फोटाची याचिका दाखल झाल्यानंतर या चर्चांना अधिकृत स्वरूप मिळालं. आता मात्र संगीता यांनीच ही याचिका मागे घेतल्याने प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. न्यायालयाने सध्याची याचिका निकाली काढली असली तरी यामुळे दोघांमध्ये समेट झाला आहे का, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
घटस्फोटाच्या चर्चांना सध्या पूर्णविराम
संगीता यांनी याचिका मागे घेतल्याने विजय आणि संगीता यांच्यातील घटस्फोटाची सध्याची न्यायालयीन प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणासोबतच दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही चर्चेत असलेल्या या प्रकरणाला सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, संगीता यांनी अचानक घटस्फोटाची याचिका का मागे घेतली आणि विजय-संगीता यांच्यात समेट झाला आहे का? याबाबत दोघांकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही.

