
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी क्लस्टर विकास योजनेवरून महायुतीतच मतभेद उफाळून आले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात क्लस्टर योजनेवर जोरदार टीका करत, “माझ्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा दाखवून देईन,” असा इशारा दिला. त्यांनी भाषणात कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गणेश नाईक यांनी क्लस्टर विकास धोरण, वाढीव एफएसआय आणि नगरविकास विभागाच्या नव्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नवी मुंबईच्या भविष्यासाठी ही योजना धोकादायक ठरू शकते, असा दावा केला.
क्लस्टर विकास योजना नेमकी काय?
जुन्या, मोडकळीस आलेल्या किंवा अतिधोकादायक इमारतींचा, संपूर्ण परिसराचा एकत्रित पुनर्विकास क्लस्टर विकास योजनेत केला जाणार आहे. या माध्यमातून मोठ्या भूभागाचा नियोजनबद्ध विकास, रुंद रस्ते, सार्वजनिक सुविधा, मोकळ्या जागा आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याचा उद्देश आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मुंबई महानगर प्रदेशातील अनेक भागांमध्ये ही योजना राबवली जात असून, नवी मुंबईतही ती लागू करण्यासाठी नगरविकास विभाग प्रयत्नशील आहे.
गणेश नाईकांचा विरोध नेमका कशाला?
गणेश नाईक यांनी क्लस्टर योजनेला विरोध करत काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. 30 वर्षे पूर्ण न झालेल्या किंवा अतिधोकादायक नसलेल्या इमारतींनाही क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नवी मुंबईतील आधीच वाढलेली वाहतूक कोंडी आणि लोकसंख्या लक्षात न घेता वाढीव एफएसआय देणे धोकादायक ठरेल. तसेच नियोजनबद्ध पद्धतीने उभारलेल्या नवी मुंबईच्या मूळ आराखड्यावर परिणाम होण्याची भीती आहे. यूडीसीपीआर (UDCPR) नियमावलीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळात आणि विधानसभेतही या धोरणाला विरोध केला आहे. नाईक यांच्या मते, नवी मुंबईतील पायाभूत सुविधा वाढीव लोकसंख्येचा भार पेलण्यास सक्षम नाही आणि मोठ्या प्रमाणात पुनर्विकास केल्यास शहरातील जीवनमानावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद कधीपासून?
गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष नवीन नाही. नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील राजकीय वर्चस्वावरून दोन्ही नेत्यांमध्ये अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. घणसोली गृहनिर्माण वसाहतीचा पुनर्विकास, नगरविकास विभागाचे निर्णय, निधी वाटप आणि स्थानिक विकासकामांवरून दोघांमध्ये यापूर्वीही मतभेद झाले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही दोन्ही नेत्यांमध्ये प्रतिष्ठेची लढत झाली होती. त्या निवडणुकीत भाजपने गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली, तर शिंदे गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतरही दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
नवी मुंबईतील गणेश नाईकांचा प्रभाव
गणेश नाईक हे गेली अनेक दशके नवी मुंबईच्या राजकारणातील प्रभावी नेते मानले जातात. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला असला तरी नवी मुंबईतील त्यांचे संघटनात्मक वर्चस्व कायम राहिले आहे. राजकीय आयुष्यात त्यांना काही निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा प्रभाव कायम असल्याचे अनेक निवडणुकांमधून दिसून आले आहे.
महायुतीत दरी वाढणार का?
राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र सत्तेत असताना क्लस्टर योजनेवरून सार्वजनिकरित्या झालेली ही टीका महत्त्वाची मानली जात आहे. एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लस्टर विकास योजनेला महायुतीतीलच वरिष्ठ मंत्र्यांनी विरोध केल्याने आगामी काळात या विषयावर राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देतात आणि भाजपचे केंद्रीय व राज्य नेतृत्व यावर काय भूमिका घेते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

