सांगली जिल्ह्यातील मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारत समितीवरील सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महाविकास आघाडीसाठी आणि जयंत पाटलांनसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या राणी भोरे यांची, तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट)च्या ललिता शेजुळ यांची बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीकडून कोणताही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
मागील निवडणुकीत बहुमताची अनुकूल परिस्थिती असूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यावेळी खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने प्रभावी रणनीती आखत भाजपच्या काही मित्रपक्षांना आपल्या बाजूने वळवले होते. त्यामुळे पंचायत समितीवरील सत्ता महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली होती.
मात्र, यावेळी राजकीय समीकरणे बदलल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी महायुतीसोबत राहिल्याने भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश आले. विद्यमान उपसभापतींसह काही सदस्यांनीही महायुतीला पाठिंबा दिल्याने भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने समितीवर पुन्हा वर्चस्व मिळवले.
दरम्यान, या विजयानंतर माजी खासदार संजयकाका पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका करत महाविकास आघाडीच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुसरीकडे, मिरज पंचायत समितीतील सत्तांतरामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. तर, जयंत पाटलांनाही हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
या निवडणुकीतील विजयामुळे महायुतीने मागील पराभवाची भरपाई केली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

