जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र उभे राहणाऱ्या आपल्या पोलिसांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. घर ही प्रत्येक कुटुंबाची सर्वात मोठी गरज असते आणि जे पोलिस आपल्या सुरक्षिततेसाठी कायम उभे असतात, त्यांनाही स्थिर आणि सुरक्षित आयुष्य मिळणं तितकंच गरजेचं आहे असं म्हणत आता राज्यातील तब्बल 5459 पोलिसांना हक्काचं घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, पोलिसांच्या घरांसाठी तब्बल 1768.08 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले घरबांधणीचे प्रस्ताव आता पुढे सरकणार आहेत. त्यामुळे हजारो पोलीस कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. फडणवीस यांनी ट्विट करत सांगितलं की, पोलिसांना स्वतःचं घर मिळावं यासाठी ते सुरुवातीपासून आग्रही होते. 2014 ते 2019 दरम्यान व्याजसवलत अनुदान योजना राबवण्यात आली होती. मात्र महाविकास आघाडीच्या काळात ही योजना बंद झाली होती. नंतर पुन्हा ती सुरू करण्यात आली आणि आता मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत घरांच्या वाढलेल्या किमतींमुळे स्वतःचं घर घेणं अनेक पोलिसांसाठी कठीण झालं होतं. अशा परिस्थितीत सरकारचा हा निर्णय पोलीस दलासाठी मोठा दिलासा मानला जातोय.


