आम आदमी पक्षात सध्या मोठी राजकीय घडामोड झाली आहे. पक्षाचे राज्यसभा खासदार Raghav Chadha यांना त्यांच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आलं आहे. एवढंच नाही, तर राज्यसभेत पक्षाच्या वतीने बोलण्यावरही काही प्रमाणात मर्यादा आणण्यात आल्या आहेत.

राघव चड्डा यांच्या जागी आता Ashok Mittal यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
पक्षाने ही कारवाई का केली?
सूत्रांच्या माहितीनुसार, चड्डा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षाशी चर्चा न करता थेट भाष्य करत होते. राज्यसभेत कोणते विषय मांडायचे, याची पूर्वकल्पना पक्षाला दिली जात नव्हती. त्यामुळे हा शिस्तभंग मानून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या काही दिवसांत चड्डा संसदेत लोकांशी संबंधित अनेक मुद्दे आक्रमकपणे मांडत होते. ब्लिंकिट डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मोबाईल रिचार्ज दर, लोकप्रतिनिधींना माघारी बोलावण्याचा अधिकार अशा विषयांवर त्यांनी जोरदार आवाज उठवला होता. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियताही वाढली होती.
पण दुसरीकडे, पक्षाच्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी मौन बाळगलं. विशेषतः Arvind Kejriwal आणि Manish Sisodia यांच्याशी संबंधित प्रकरणांवर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे ते पक्षाच्या धोरणापासून दूर जात असल्याची चर्चा सुरू होती.
तसंच, आगामी निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या स्टार प्रचारकांच्या यादीतही त्यांचं नाव नव्हतं.
या कारवाईमुळे AAP मधील अंतर्गत मतभेद समोर आले का, की ही फक्त शिस्तभंगाची कारवाई आहे, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
