देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 2026-2027 या वर्षासाठी केंद्रीय बजेट सादर केलं. बजेट सादर होताच, शेअर मार्केट घसरलं. यामागचं कारण म्हणजे बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी फ्युचर्स अँण्ड ऑप्शन्सवरील STT म्हणजेच सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे आता ट्रेडर्ससाठी ट्रेंडिग करण महाग होणार आहे. आधीच 90 टक्के फ्युचर्स अँण्ड ऑप्शन्स ट्रेडर्स तोट्यात असताना आता वाढीव टॅक्समुळे नफा आणखी कमी होणार या भीतीमुळे बाजारात नकारात्मक भावना पसरली आणि बाजार काही मिनिटांतच कोसळला.

ऑप्शन ट्रेडिंग ट्रान्झॅक्शनवरील हा टॅक्स पूर्वीच्या 0.02 टक्क्यांवरुन 0.05 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला. ऑप्शन प्रिमियमवरील STT म्हणजेच सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सदेखील 0.15 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. सोप्या भाषेत सांगायचं तर शेअर बाजारात शेअर्स आणि फ्युचर्स किंवा ऑप्शन्सची खरेदी आणि विक्री करताना सरकार जो कर लावते, तो STT. हा कर तुमच्या नफ्यावर किंवा तोट्यावर अवलंबून असतो. एकदा का तुम्ही शेअर्स खरेदी किंवा विक्री केले की तुम्हाला हा कर द्यावाच लागतो. पण हा कर वेगळा भरण्याची गरज नसून तुमच्या ब्रोकरकडून तो थेट कापला जातो आणि सरकारकडे जमा केला जातो.
