भारत, बांगलादेश, आयपीएल, टी-२० विश्वचषक आणि मुस्तफिजुर रहमान या मुद्द्यांमुळे सध्या संपूर्ण क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आदेशानंतर कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजुर रहमानला टीम मधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. यामागे बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात सोशल मीडियावर सुरू झालेल्या निषेध कॅम्पेनचा मोठा प्रभाव असल्याचं म्हटलं जात आहे.
या प्रकरणामुळे भारत-बांगलादेश क्रिकेट संबंधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणारा भारताचा बांगलादेश दौरा यशस्वी होईल, असं प्रेडिक्ट केलं जात होतं. पण आता दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांमधील आश्वासने पुन्हा एकदा मोडली गेल्याचं चित्र दिसत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अधिकृत पत्रक जारी करत २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कप मधील बांगलादेशच्या मॅचेस भारताबाहेर आयोजित करण्याची मागणी आयसीसीकडे केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत भारतातील सामने भारताबाहेर हलवण्याची मागणी आयसीसीकडे केली आहे. भारतातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता संघ पाठवणे सुरक्षित नसल्याचे बीसीबीचे म्हणणे आहे. आयोजकांसमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, आयसीसी बांगलादेशची ही मागणी मान्यही करू शकते, मात्र अजून अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.
क्रिकबझच्या अहवालानुसार, सध्याच्या टाईमटेबलनुसार बांगलादेश संघाने कोलकात्यात तीन आणि मुंबईत एक मॅच खेळायची आहे. या मॅचेस ७, ९, १४ आणि १७ फेब्रुवारी या दिवशी नियोजित आहेत. पुढच्या दोन दिवसांत यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सगळ्या गोंधळाच्या दरम्यान ढाक्यात झालेल्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भारतातलं सध्याचं वातावरण खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी सुरक्षित नसल्याचं बीसीबीने त्यांच्या पत्रात नमूद केलं आहे. त्यामुळे बांगलादेश टी-२० वर्ल्ड कप साठी भारतात त्यांची टीम पाठवणार नसल्याचा ठाम निर्णय त्यांनी घेतला आहे. बीसीसीआयशी संबंधित काही सूत्रांच्या अनुसार स्पर्धेच्या इतक्या जवळ जाऊन सामन्यांचे वेन्यू बदलणे हे आयोजक आणि ब्रॉडकास्टर्ससाठी मोठं आव्हान ठरू शकतं. लॉजिस्टिक्स, तिकीट विक्री आणि थेट प्रक्षेपणाशी संबंधित अनेक अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
मुस्तफिजुर रहमानच्या आयपीएलमधील भवितव्यावरही मोठं प्रश्नचिन्ह आहे. आयपीएल लिलावात केकेआरने त्याला ९.२० कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. पण वाढत्या राजकीय तणावामुळे आणि सुरक्षेच्या कारणांमुळे बीसीसीआयकडून कठोर भूमिका घेतली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान त्याने पीएसएल जॉईन केल्याच्याही बातम्या येत आहेत.
भारत आणि श्रीलंका एकत्रितपणे टी-२० वर्ल्ड कपचं आयोजन करत आहेत. हा वर्ल्ड कप ७ फेब्रुवारी पासून सुरू होणार असून फायनल मॅच ८ मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. बांगलादेशच्या भूमिकेमुळे या स्पर्धेच्या आयोजनावर काय परिणाम होतो, याकडे आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे.
