
सोन्या-चांदीचे दर दिवसेंदिवस वाढत असतानाच, भविष्यातील खऱ्या गुंतवणूक संधी तांब्यामध्ये दडल्या आहेत, असं मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. Reuters च्या सर्वेक्षणात ३० तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, २०२६ मध्ये तांब्याचे सरासरी दर $१०,५०० प्रति टन (LME वर) पर्यंत पोहोचू शकतात.
सध्या तांब्याचा दर $१२,००० प्रति टन या विक्रमी पातळीच्या जवळ आहे. आधी Reuters ने तांब्याचा पुरवठा अतिरिक्त (Surplus) राहील असा अंदाज दिला होता. मात्र आता त्यात बदल करून २०२५ मध्ये १,२४,००० टन आणि २०२६ मध्ये १,५०,००० टन तांब्याचा तुटवडा निर्माण होईल, असं नमूद करण्यात आलं आहे.
चिली, पेरू आणि काँगोमधील खाणकामातील व्यत्यय ही या तुटवड्याची मुख्य कारणं मानली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर तांब्याच्या किमतींमध्ये दीर्घकालीन मोठी उसळी येण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
तांब्याला भाव येण्यामागे आणि यातून ‘करोडपती’ होण्याची संधी निर्माण होण्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत.
१. इलेक्ट्रिक वाहने (EV) आणि हरित ऊर्जा
डिझेल-पेट्रोलच्या वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ३ ते ४ पट अधिक तांबे वापरला जातो. बॅटरी, मोटर्स आणि वायरिंगसाठी तांबे अपरिहार्य आहे. जग जसजसं ‘नेट झिरो’ उत्सर्जनाकडे वाटचाल करत आहे, तसतशी सोलर पॅनेल आणि विंड टर्बाइन्सची मागणी वाढत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तांब्याचा वापर होतो.
२. डेटा सेंटर्स आणि AI (Artificial Intelligence)
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि क्लाउड कॉम्प्युटिंगच्या वाढत्या प्रभावामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर्स उभारले जात आहेत. या सेंटर्सना लागणारी प्रचंड वीज आणि कूलिंग सिस्टिमसाठी तांब्याची मागणी झपाट्याने वाढत आहे.
३. मागणी आणि पुरवठा यातील तफावत
एकीकडे तांब्याची मागणी वेगाने वाढत आहे, तर दुसरीकडे नवीन खाणींतून उत्पादन सुरू होण्याचा वेग संथ आहे. एखादी तांब्याची खाण शोधून तिथून उत्पादन सुरू होण्यासाठी १०–१२ वर्षे लागतात. यामुळे येत्या काळात तांब्याचा तुटवडा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
Reuters नुसार, केवळ डेटा सेंटर्समुळेच २०३० पर्यंत तांब्याची मागणी दरवर्षी १ दशलक्ष टनांनी वाढू शकते. २०२५ मध्ये आतापर्यंत तांब्याने ३५% पेक्षा जास्त परतावा दिला असून, ही २००९ नंतरची सर्वात मोठी वार्षिक वाढ ठरू शकते.
Goldman Sachs सारख्या संस्थांनी तर असा अंदाज व्यक्त केला आहे की, तांब्याचे दर २०३५ पर्यंत $१५,००० प्रति टन पर्यंत जाऊ शकतात. जागतिक बाजारपेठेत ‘Red Gold’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या धातूकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधलं जात आहे.
मग तांब्यात गुंतवणूक करायची कशी? थेट तांबे खरेदी करण्याऐवजी, तज्ज्ञांच्या सल्ल्याने खालील पर्यायांचा विचार करता येऊ शकतो.
• कमोडिटी मार्केट – जिथे तांब्याच्या फ्युचर्समध्ये ट्रेडिंग करता येते.
• स्टॉक मार्केट – तांबे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणे, जसे की Hindustan Copper आणि Vedanta.
• ETF – तांब्यावर आधारित एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये गुंतवणूक करणे.
