लोकांनी टाकून दिलेल्या फर्निचरमधून एक महिला लाखो रुपये कमावते, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं, तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. अमेरिकेतील एक महिला रस्त्यावर फेकून दिलेल्या किंवा लोकांनी विकायला काढलेल्या जुन्या फिर्निचरमधून लाखो रुपयाची कमाई करते.
अमेरिकेत राहणाऱ्या मॉली हॅरिसने (Molly Harris) स्वत: एक असा व्यवसाय सुरू केला आहे, ज्यातून ती लाखो रुपये कमवते. लोकांनी टाकून दिलेल्या वस्तू घरी आणणे किंवा जुन्या वस्तू विकत घेणे, असं काम हॅरिस करायची. लोकांकडून जुन्या वस्तू विकत घ्यायचं, त्यांना दुरुस्त करायचं, त्यावर नक्षीकाम करायचं आणि योग्य किंमतीत पुन्हा लोकांना विकायचं, असं काम हॅरिस करते. टाकण्यायोग्य वस्तू वापरण्यायोग्य बनवल्यामुळे लोकांनाही त्या वस्तू आवडू लागल्या. त्या कामातून हॅरिसलाही दुप्पट किंवा तिप्पट किमत मिळू लागली.
दोन मुलांची आई असलेली मॉली हॅरिस हिचं वय 32 वर्षे आहे. हॅरिसचे कुटुंब सुरुवातीला अमेरिकेतल्या लोवा या भागात राहायचे, नंतर तिचं कुटुंब फ्लोरिडाला शिफ्ट झालं. तिथे हॅरिसच्या कुटुंबाने एक लहान घर विकत घेतलं. हॅरिसचा पती एका खासगी कंपनीत काम करतो. पतीप्रमाणेच हॅरिसलाही एखाद्या कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा होती, मात्र कुटुंबाचा सांभाळ करावा लागल्यामुळे तिने नोकरीची इच्छा सोडून दिली. नोकरी नाही, पण व्यवसाय तरी करु शकतो, या भावनेने हॅरिसने हा व्यवसाय सुरु केला.
सुरुवातीला घराशेजारी राहणाऱ्या लोकांनी टाकून दिलेलं फर्निचर कमी किमतीत विकत घेण्याचं काम हॅरिस करु लागली. त्या साहित्याला आपल्या घरी आणायचं आणि आपल्या कलाकृतीतून त्यावर सुंदर काम करायचं असा दिनक्रम हॅरिसचा सुरु झाला.
हॅरिस ही सरुवातीला रोपवाटिकेच्या संबंधित वस्तू विकायची. मग हळू हळू फर्निचरवरही काम करायला सुरुवात केलं. फर्निचरचं काम कधी एका दिवसात पूर्ण व्हायचं, तर कधी त्या कामाला काही आठवडे लागू लागले. आपल्या कामाची विक्री हॅरिस कधी मार्केटप्लेसवर करते, तर कधी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही साहित्याची विक्री करते. विकलेल्या वस्तूंमधून आठवड्याला सरासरी 41 हजार ते महिन्याला अंदाजे लाखभर रुपये ती कमवते.
आपलं काम जगापर्यंत पोहोचवण्यासाठी ती इंस्टाग्राम, यूट्यूबसारख्या सोशल मीडियाचा वापर करते. लोकांनी टाकून दिलेल्या फर्निचरला हॅरिसने दिलेला मेकओव्हरही आता लोकांना आवडू लागलाय. त्यामुळे तिच्या कामांचं नेटकऱ्यांकडून चांगलंच कौतुक होताना दिसतंय.
डेलीमेल डॉट कॉमशी बोलताना हॅरिस म्हणते की ‘रस्त्याच्या कडेला पडलेल्या फर्निचरवर नेहमी माझं लक्ष असतं, ज्यामध्ये तुटलेल्या बुकशेल्फपासून ते दुरुस्त करता येऊ शकणाऱ्या जुन्या ड्रेसरपर्यंतचं साहित्य असतं. माझ्या डोक्यात फक्त त्या गोष्टी दुरुस्त करण्याचा प्लॅन असतो, पण नंतर त्यावर सुशोभिकरणाचं काम होतं. त्यामुळे मला आता हे काम आवडू लागलंय आणि त्यातून मला योग्य असा मोबदलाही मिळू लागलाय.