Lagavbatti

day, 00 month 0000

वाचाल तर कळेल!

स्टार बनण्याची पात्रता नाही म्हणत कधीकाळी हेमा मालिनीला चित्रपटातून काढून टाकलेलं…

Hema Malini First Movie

१९६८ सालच्या ‘सपनो का सौदागर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये हेमा मालिनीने पदार्पण केलं. त्यानंतर अंदाज, लाल पत्थर, ड्रीम गर्ल, शोले इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये तिने नायिकेच्या भूमिकेला न्याय दिला. १९७० च्या दशकामध्ये ती बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. इतक्या यशस्वी अभिनेत्रीला एकदा एक अपमान सहन करावा लागला होता. तो म्हणजे एका तमिळी निर्मात्याने तुझ्यात स्टार बनण्याची पात्रताच नाही, असा दिलेला शेरा. ही घटना तेव्हाची आहे, जेव्हा हेमा मालिनी नुकतीच नृत्य क्षेत्रात आपलं नाव कमावत होती.

नृत्य क्षेत्रात हेमा मालिनीची वेगानं प्रगती होत होती, त्याचवेळी एक अनपेक्षित घटना घडली. हेमाला चित्रपट निर्मात्याकडून अनेक ऑफर्स येत होत्या. हेमा तेव्हा जेमतेम चौदा वर्षाची होती. स्टेजवर गुणी कलाकार आला की हेरायचा आणि त्याला आपल्या चित्रपटात घ्यायचं, ही सिनेमावाल्यांची जुनी सवय होती. कलाक्षेत्रात हेमाचं नाव होऊ लागलं, तेव्हा चित्रपट निर्मात्याचं लक्ष तिच्याकडे जाणं स्वाभाविक होतं. तिला एका पाठोपाठ एक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. तिला सर्वात पहिली ऑफर होती तामिळ चित्रपट निर्मिता वेल्लू मणी यांची.

गंमतीची गोष्ट म्हणजे तोपर्यंत हेमाला चित्रपटांची आवड राहिली दूरच, चित्रपट काय असतो, कसा बनतो हेही माहिती नव्हतं. नृत्यामध्ये समरस झालेल्या हेमाला सिनेमा पाहायला वेळच मिळत नसायचा. एकंदरीत चक्रवर्ती कुटुंबाला सिनेमाचं खास असं कौतुक किंवा आकर्षण नव्हतं. हेमा चित्रपटात काम करायला सुरुवात केल्यानंतर हेमाने चित्रपट पाहायला सुरुवात केली. तिच्यासाठी करमणूक म्हणजे नृत्याचा नाहीतर गायनाचा कार्यक्रम होता. तिच्या आईची इच्छा होती की तिच्या मुलींनी नर्तिका म्हणून नाव मिळवावं. हेमाने कधीकाळी फिल्मस्टार बनेल अशी कल्पना स्वप्नातसुद्धा केली नव्हती.

दरम्यान हेमाच्या दोघा भावांचं कॉलेजचं शिक्षण संपलं होतं. दोघे भाऊ आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर होते. तरीही आपल्या धाकट्या बहिणीकडे त्यांचं लक्ष होतं. अशातच एक तमिळ चित्रपट निर्मिता चक्रवर्ती यांच्या घरी आला आणि त्यानं अख्या घराला जणू शॉक दिला. तो हेमाला सिनेमाची हिरोईन बनवायला निघाला होता! पण चक्रवर्ती भुलले नाहीत. त्यांनी ऐकताचक्षणी पिक्चरची ऑफर सरळ धुडकावली, मात्र हेमाच्या आईच्या मनात मात्र वेगळा विचार चालू होता. त्यांना चित्रपट व्यवसायाबद्दल काहीच माहिती नव्हतं.

मात्र या क्षेत्रात त्यांची काही जणांशी ओळख होती. ओळखीच्या लोकांचं मत घ्यायचं त्यांनी ठरवलं. त्या लोकांचं म्हणणं होतं की चक्रवर्तीने या मागणीचा अवश्य विचार करावा. कारण तो निर्मिता म्हणजे सिनेसृष्टीतलं मोठं प्रस्थ आहे. परंतु हेमा यांच्या वडिलांना हे मुळीच पटलं नाही. त्यांना हेमाने चित्रपटात काम करावं हे मंजूर नव्हतं. खरंतर हेमादेखील सिनेमात काम करायला मुळीच उत्सुक नव्हती. परंतु हेमाच्या आईचं म्हणणं होतं की, तू एक सिनेमा करून बघ तो अनुभव आवडला नाही, तर आपण तिथेच थांबू. हा विचार हेमाला पटला.

दुसर्‍याच दिवशी त्या चित्रपटाच्या निर्मात्याने थाटामाटात चित्रपटाची घोषणा केली. त्या चित्रपटात असणाऱ्या दोन्ही नायिका म्हणजेच, जयललिता आणि हेमा यांच्यावर वृत्तपत्रातून स्तुतीसुमने उधळली. (जयललिता पुढे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या) हेमा मालिनी हे नाव सिनेमाच्या नायिकेला शोभेसं नाही, असं त्या चित्रपट निर्मात्याला वाटलं. म्हणून त्यांनी हेमाचं नाव बदलण्याचा आग्रह धरला. हेमासाठी सुजाता हे नाव त्याने सुचवलं. जया चक्रवर्तीनी त्यासाठी समंती दिली परंतु दुःखाने! रीतसर पत्रकार परिषद घेऊन त्या बड्या निर्मात्यांनं या चित्रपटाचे शूटिंग सुरू केलं. दोन्ही नायिकांसाठी त्यांनी भरमसाठ महागडे कपडे तयार करून घेतले.

अर्थात हेमाचा तो पहिला चित्रपट होता. सगळं वातावरण तिच्यासाठी नवखं होतं. त्या काळात हेमा वरकरणी शांत दिसायची, पण आतल्या आत मात्र ती घाबरली होती. तिच्या मनातली भीती दिवसेंदिवस वाढत होती. त्यावेळेस ती लहानही नव्हती आणि मोठीही नव्हती. सिनेमाच्या सेटवर सर्वस्वी निराळं वातावरण तिला आणखी नाउमेद करत होतं. यावेळी नशीबदेखील हेमाला साथ देत नव्हतं. ध्यानीमानी नसताना तिच्यावर जबर प्रहार झाला. मदुराईमध्ये काही महिने शूटिंग केल्यानंतर, एका भल्या सकाळी चक्रवर्ती दाम्पत्याला एका वृत्तपत्रात विचित्र बातमी आढळली. हेमाला पहिली संधी देणाऱ्या ‘त्या’ निर्मात्यानं हेमाला चित्रपटातून काढून टाकलं होतं आणि तिच्या जागी दुसर्‍या अभिनेत्रीला काम दिलं होतं.

या घटनेबद्दल हेमाची प्रतिक्रिया स्वाभाविकपणे हळवी होती. तिच्यासाठी तो जबर धक्का होता. कुणीतरी खाडकन चपराक मारली, असं तिला वाटत होतं. ‘काही काम द्या’ म्हणून त्या निर्मात्यामागे कधी हेमा मालिनी गेली नाही. प्रत्यक्ष भेटल्याविनाच त्या निर्मात्याने हेमाला सिनेमातून काढणं भयंकर अपमानास्पद आणि लाजिरवाणं होतं. ‘हेमामध्ये स्टार बनण्याची पात्रताच नाही’ असा शेरा त्या निर्मात्याने एका पत्रकाराला मुलाखत देताना मारला होता. हे सांगताना आजही हेमाचा स्वर दुखरा होतो.

त्या सिनेमात काम करताना आपण नसत्या फंदात पडलो असं तिला सारखं वाटत राहायचं. त्या निर्मात्याच्या निर्णयापेक्षा त्याची वागण्याची तऱ्हा सर्वांनाच खटकली होती. त्याने हा निर्णय परस्पर जगजाहीर करण्याऐवजी आधी आम्हाला सांगायला हवा होता, असा चक्रवर्ती कुटुंबाचा सुर होता. आधी स्वतः होऊन बोलवायचं आणि नंतर चित्रपटातून काढून टाकायचं. यामुळे हेमा मालिनीचे कुटुंबीय नाराज झाले होते.

Scroll to Top