पी. व्ही. नरसिंहराव यांना 9 वे पंतप्रधान म्हणून आपण ओळखतो. पण यापलीकडे त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी ज्या आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. त्याबद्दल त्यांना आपण कायमच सन्मानित करत आलो आहोत. खरं पाहता नरसिंह राव यांनी, १९९५ मध्येच पोखरण परमाणु परीक्षणाची तयारी दर्शवली होती परंतु काही तांत्रिक कारणास्तव त्यांनी परिक्षण मात्र केलं नाही. पी. व्ही. नरसिंहराव तेव्हा अटलजींना असे म्हणाले होते की , “सामग्री तयार है, तुम आगे बढ सकते हो” त्या एका वाक्याने नंतर भारत कायमचा बदलला…
इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, नरसिंहराव याचं महाराष्ट्र कनेक्शन.. ते कसं? तर 28 जून 1921 रोजी त्यांचा जन्म झाला होता. नरसिंहराव यांचे संपूर्ण शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून झाले. यातील दोन विद्यापीठे महाराष्ट्रातील आहेत. तसेच नागपूर जिल्ह्यातील रामटेक या मतदारसंघाचे 2 वेळा ते खासदारही होते. वर्ष 1984-89 आणि 1989-91 निवडणुकीत ते रामटेक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
नरसिंहराव यांना मराठी भाषा ही उत्तम लिहता, वाचता यायची. नरसिंहराव यांचे तब्बल 17 भाषांवर प्रभुत्व होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तामिळ, उर्दू, कन्नड यासह इतर भाषांतून त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. राजकीय निवृत्ती जाहीर केल्यानंतर ते पंतप्रधान बनले हीदेखील रंजकच गोष्ट म्हणावी लागेल.
नरसिंहराव यांची राजकीय कारकीर्द खूप मोठी आहे. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अश्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. पण राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी 1991 ची लोकसभा निवडणूक लढवली नाही. पण याच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर नरसिंहराव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. निवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेस पक्षाचे नेते म्हणून नरसिंहराव यांची निवड झाली आणि त्यांनी 21 जून 1991 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद उद्ध्वस्त केली. त्याच दिवशी सायंकाळी केंद्र सरकारने उत्तरप्रदेशातील भाजप सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. तसेच भारतीय जनता पक्ष सत्तेत असलेली राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश ही राज्य सरकारे बरखास्त केली होती. तसेच त्यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. नरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंग या निष्णात अर्थतज्ज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काम केले. 1991 मधे देशाला नवे आर्थिक धोरण मिळाले.
पंतप्रधान राव यांनी आपल्या दूरदृष्टीने देशाला आर्थिक विकासाच्या वाटेवर नेले. अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या सोबतीने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. पण पंतप्रधान असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. १९९४ साली नरसिंह राव यांच्या सरकारावर हर्षद मेहता प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे ९४ साली झालेल्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला.
तर १९९५ साली झालेल्या महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि ओडिशा या राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात केवळ ओडिशामध्ये काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली. सलग अनेक राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला. त्याला राव यांना जबाबदार धरून १९९८ साली लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले.
त्यांनंतर ९ डिसेंबर २००४ ला दुर्दैवाने पी. व्ही. नरसिंहराव यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. १४ दिवस पी व्ही नरसिंहराव यांनी मृत्यूशी झुंज दिली. परंतु २० डिसेंबर २००४ रोजी भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.