उत्तर प्रदेशमध्ये नायलॉन मांजामुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटनांवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बंदी असतानाही नायलॉन मांजा बाजारात कसा विकला जातो, असा थेट सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला असून यावर तात्काळ आणि कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. योगी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आता नायलॉन मांजामुळे कोणाचाही मृत्यू झाला, तर तो अपघात नव्हे तर ‘हत्या’ मानली जाईल.
मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रमुखांना आदेश दिले आहेत की, संपूर्ण राज्यात जिल्हावार छापेमारी करून नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आणि वापरणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी. नायलॉन मांजाची विक्री व वापर कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.

प्रत्यक्षात, यूपीमध्ये नायलॉन मांजावर आधीपासूनच बंदी आहे. मात्र तरीही गेल्या एका वर्षात नायलॉन मांजामुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अलीकडेच लखनऊमध्ये चालत्या बाईकवर असलेल्या एका एमआरचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला गेला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख मोहम्मद शोएब (वय 33) अशी झाली आहे. ही घटना हैदरगंज ओव्हरब्रिजवर घडली होती. याआधी 14 जानेवारी रोजी जौनपूरमध्ये डॉ. समीर हाशमी (28) यांचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याने मृत्यू झाला होता. मांजाची धार इतकी तीक्ष्ण होती की त्यांच्या मानेतील हाडही कापले गेले होते. याशिवाय शाहजहांपूर, अलीगढ, गोरखपूर आणि इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारच्या घटनांत नागरिकांचा जीव गेला आहे.

तज्ज्ञांच्या मते, चीनमधून येणाऱ्या नायलॉन मांजामध्ये काच, लोखंडाचा चुरा आणि मेटॅलिक पावडर मिसळलेली असते. त्यामुळे हा मांजा अतिशय धारदार होतो आणि तुटतही नाही. वेगात गळ्याला लागल्यास तो थेट प्राणघातक ठरतो.
यूपी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, नायलॉन मांजाच्या बेकायदेशीर नेटवर्कची ओळख पटवून दोषींना तुरुंगात पाठवले जाईल. सरकारचा हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
