पुण्यातील हीट अँड रन प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन अपडेट्स समोर येताहेत. ज्या अल्पवयीन मुलाकडून अपघात झाला, त्याच्या वडिलांना आणि आजोबांनाही अटकेत टाकलंय, पण त्याही पेक्षा त्या अल्पवयीन मुलाला दारु दिल्यामुळे संबंधित पबवरही कारवाई करण्यात आली आणि पब मालकांनाही अटक करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात कितीजण अटकेत आहेत, तर २७ मेपर्यंत अग्रवाल कुटुंबातले तीघे, कोजी बारसंबंधित तिघे, ब्लॅक बार संबंधित तीघे आणि ससून रुग्णालयातील तिघांना पोलिसांनी अटक केलीये. बाकी पुणे क्राइम ब्रांचच्या पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ टोडकरी यांचे निलंबन करण्यात आलं आहे. हे संपूर्ण प्रकरण लावून धरलं ते काँग्रेसचे कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आणि हेच धंगेकर पोहोचले पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात.
अपघाताच्या ९ तासानंतर आरोपीची ससून रुग्णालयात ब्लड टेस्ट झाल्याचं सांगितलं जातं, पण ते ब्लड मुख्य आरोपीचं नसतं, हा प्रकार घटनेच्या अनेक दिवसांनी स्पष्ट होतो, यामध्ये ससूनमधील तेच अधिकारी असतात, ज्यांचं नाव पुण्यातील ललित पाटील ड्रग्स प्रकरणातून समोर आलं होतं, पब संदर्भातील इतकी मोठी घटना होतेय, तरीही पुण्यातील अनेक बार आणि पब विनापरवाना रात्री उशिरापर्यंत सुरु असतात, असे अनेक आरोप करत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात राडा घातला, तो राडा का झाला, धंगेकर आणि अंधारे यांची प्रमुख मागणी काय होती?
२७ मेच्या सकाळी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेस नेते मोहन जोशी अशा नेत्यांच्या उपस्थितीत पुण्यातील राज्य उत्पादक शुल्कच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. हातामध्ये पाचशेंच्या नोटा आणि खोक्यांवर राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांचा फोटो लाऊन घोषणा बाजी करण्यात आली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक चरणसिंह राजपूत यांनाही धंगेकर आणि अंधारेंनी जाब विचारला.
याचवेळी अधिक्षक राजपूत यांनी समोरुन होत असलेल्या आरोपांना चुकीचं ठरवलं. त्यावेळी भडकलेल्या सुषमा अंधारेंनी पुण्यात होत असलेल्या हप्ते वसुलीची संपूर्ण यादीच वाचून दाखवली. या यादीनंतर अधिक्षकांनीही जिथे कुठे कारवाई बाकी आहे, तिथे कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.
रवींद्र धंगेकर, आणि सुषमा अंधारे यांनी आरोप केलेल्या हॉटेल आणि बारची यादी पाहण्यासाठी पुढील व्हिडीओवर क्लिक करा :