आज तमाशाला अतिशय वाईट दिवस आले आहेत. तमासगिरांकडं पाहण्याचा दृष्टिकोनही फार वाईट बनलेला आहे. गावोगावच्या जत्रांपासून मराठी चित्रपटांपर्यंत सर्वत्र अधिराज्य गाजवणारा तमाशा आणखी किती दिवस टिकेल हे मात्र काळच ठरवणार आहे. महाराष्ट्राला रिझवीणारा ‘तमाशा जगला पाहिजे’ हीच कळवळा घेऊन काही फड अजूनही उभे आहेत.
महाराष्ट्राच्या लोकसंचितात तमाशाचं स्थान सातत्यानं अव्वल राहिलेलं आहे. अनेक वर्षांपासून तमाशा वेगवेगळ्या रुपाने रसिकांना रिझवत आला आहे.
तमाशा शब्द कुठून आला ?
‘तमाशा’ हा मूळ शब्द पर्शियन भाषेतून उर्दूत आला आणि उर्दू भाषेतून तो मराठी भाषेत आला. मूळ पर्शियन आणि उर्दू या दोन्ही भाषांमध्ये तमाशा या शब्दाचा अर्थ ‘मौजेचं, आनंदाचं किंवा आश्चर्यकारक दृश्य असा अर्थ होतो. आरंभीच्या काळात मराठीत देखील तमाशा चा अर्थ आनंद देणारं वा मौजमजेचे साधन असाचं अर्थ होता.
तमाशाची सुरुवात झाली कशी ?
शेकडो वर्षांपासून मराठी मनाला भुरळ घालणाऱ्या तमाशाची सुरूवात मोठ्या गंमतीशीर रीतीने झाली आहे. सन 1526 साली बाबर दिल्लीचा बादशहा बनला. बाबरानंतर त्याचा वंशज अकबर यानं चहूमुलखी साम्राज्य वाढवलं. या वाढलेल्या साम्राज्याचा, शहाजहान आणि पुढे औरंगजेब यांनी मोठ्या ऐषाआरामात उपभोग घेतला. बादशहांच्या चैनी आणि रंगेल वृत्तीमुळे आणि सतत रिकाम्या असल्यामुळे त्यांच्या फौजा ही रंगेल आणि चैनी बनल्या. 1526 पासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1707 पर्यंत उणीपुरी पावणे तीनशे वर्ष बाबराच्या वंशानं भारत देशावर राज्य केलं.
याच दरम्यान महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्यचा उदय झाला. सन 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी आलेल्या अफजलखानाचा वध महाराजांनी केल्यावर औरंगजेबाने पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा बीमोड करण्याचे ठरविले. सन 1674 साली महाराजांचा राज्याभिषेक झाला.
औरंगजेबाचं कटकारस्थान चालूच होतं. सन 1680 मध्ये महाराज गेले आणि औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याचे लोट महाराष्ट्राकडे धावले. सन 1689 मध्ये औरंगजेबाने राजे संभाजी महाराजांचा वध करून, महाराष्ट्राच्या अस्मितेला जबरदस्त चपराक दिली.
या काळात महाराष्ट्रात औरंगजेबाच्या फौजांचे हजारो तळ पडलेले होते. सुखासीन बनलेल्या या रंगेल आणि चैनी फौजांना वैषयिक अतृप्ततीत दीर्घकाळ काढावा लागत असायचा. त्यामुळे शृंगार आणि विषयवासना अशा स्वरूपाच्या करमणुकीची गरज त्यांना भासत होती. त्यावेळी महाराष्ट्रात गोंधळी, जोशी, भराडी, बहुरुपे, जोगी, वासुदेव, कोल्हाटी, कंजारी, बाळसंतोसी, भुते, गारुडी अशा लोककलावंत मंडळी लोक रंजनाचं काम करत होती.
परंतु त्यांच्या रंजनाने फौजी लोक सुखावत नसत. मग नंतर उत्तरेकडच्या नायकिणी नाचवल्या जात असायच्या. मग इकडच्याही लोककलावंतांच्या ताफयाला, फौजी सैनिकांनी नाचणार्या बायकांची मागणी केली. सुरुवातीला स्त्री वेषातला नाच्या लोककलावंतांच्या मेळ्यात आला. परंतु मुस्लीम सैन्याला इथल्या लोककलावंतांची पदं,गीत,गवळणी मध्ये रुची नव्हती. त्यांना हवा होतं मदमस्त शृंगारिक नाच गाणं.
मग यातूनच जुळवाजुळव झाली, कोल्ह्याट्याची ढोलकी, दौऱ्याचं तुंणतुणं, भजनातल्या झांजा लोखंडाची कढी असा वाद्यमेळ लोक कलावंतांकडून आला. तमाशातले झणक्या-तणक्यातलं संवाद रूप भारुडात आलं. वाघ्या-मुरळीची हाळी घालून सुर देण्याची पद्धत घाटणीत उतरली.
मुळात मराठी स्वभावधर्म कडक आणि त्यातुन उघड्या तळावर असणारे असे कार्यक्रम करावे लागत. त्यामुळे तमाशाच्या आवाजात खणखणीतपणा आला. तमाशात स्त्री नर्तिका आली. ती राधा गवळणीच्या रूपाने! अशा रीतीने उभ्या राहिलेल्या फडाला मुस्लिम फौजांनी नाव दिलं तमाशा आणि मग हा तमाशा मुस्लीम फौजांची शृंगारीक भूक भागवीत रंजन करू लागला.
सन 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. आणि सन 1808 साली शाहू महाराजांनी सातारा ला राजधानी स्थापन करून पुण्याची पेशवाई बाळाजी विश्वनाथ यांना दिली. राजा साताऱ्यात आणि प्रधान पुण्यात अशी स्थिती असली तरीही, पुढं या पेशवे घराण्यानं सन 1757 साली अटकेपार झेंडा फडकविला. सन 1708 ते 1758 या काळात मोगलांचा पुरता पाडाव झाला. आणि सर्वत्र मराठा सैन्याच्या छावण्या पडल्या.
पूर्वी मोगलांच्या फौजी छावण्यांमधून खेळ करणारे खेळीये आणि तमासगिर आता मराठा सैन्याचं रंजन करू लागले.
पेशवाईच्या काळात पुढ सुखासीन बनलेल्या पेशव्यांनी या कलेची मोठ्या प्रमाणात बिदागी देऊन कदर केल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. सन 1744 साली अनंत फंदी या शाहिराचा जन्म झाला. पुढं कटावकर म्हणून प्रसिद्ध पावलेल्या या शाहिराने तरूणपणी लावणी तमाशाचा फड काढला.
सन 1754 आणि 1758 या साली अनुक्रमे प्रभाकर आणि राम जोशी हे शाहीर जन्मले. राम जोशी यांनी सोलापूरचा लावणीचा फड पुण्यात गाजवला. पुण्याचा गंगु हैबतीच्या फडातला प्रभाकर हा याच काळातला.
होनाजी आणि त्याचा चुलता बाळा यांनी संयुक्तपणे लावण्या लिहून फड गाजवले. या होनाजी बाळा वर दुसऱ्या बाजीराव चा फार प्रेम होतं, त्यांना अनेक बक्षीसं दिल्याची नोंद पेशवे दप्तरी दिसून येते. बाजीरावांचा तमाशा वेडाबद्दल सरकारी रियासतकार गो.स. सरदेसाई यांनी ‘युद्धाच्या वणव्यातील बाजीरावाचे ढंग’ या पुस्तकात लिहिला आहे.
अनंत फंदी, रामजोशी, प्रभाकर, होनाजी -बाळा, सगनभाऊ या लावणी कलाकारांबरोबरच काळाच्या पडद्याआड नामशेष झालेल्या अनेक तमासगीर कलावंतांनी पेशवाईच्या काळात तमाशाला भरभराटीचे वैभवी दिवस आणले.