Lagavbatti

day, 00 month 0000

वाचाल तर कळेल!

Exit Poll 2024 : अशक्य! युतीला 45 आणि मविआ 30 जागा मिळणं कठीण; दोन्ही आघाडींचे आकडे काय सांगतात?

Exit Poll 2024

अशक्य! युतीला 45 आणि मविआ 30 जागा मिळणं कठीण; दोन्ही आघाडींचे आकडे काय सांगतात?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र होते, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवली होती. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि AIMIM ने एकत्र निवडणूक लढवली होती. त्या 48 जागांवर निकाल काय लागला होता; तर 41 जागांवर भाजप आणि शिवसेनेचा विजय, 6 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विजय तर अपक्ष म्हणून नवनीत राणा जिंकून आल्या होत्या, त्यांनी नंतर भाजपला पाठिंबा दिला. भाजप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 1 आणि अपक्ष 1 असा निकाल २०१९ ला लागला होता. यंदामात्र परिस्थिती वेगळी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून, त्यातील एक गट भाजपसोबत तर दुसरा गट काँग्रेससोबत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मतांमध्ये झालेल्या विभाजनाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला होता. या सगळ्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळणार, यावर चर्चा सुरु झाल्या होत्या. जागा किती येतील याचा निकाल चार जूनलाच कळेलच, मात्र त्याआधी एक गोष्ट नक्की आहे की दोन्ही आघाडीने ज्या जागांचा दावा केला होता, त्या जागांपर्यंत महाविकास आघाडी असो की महायुती, पोहोचताना दिसत नाहीत. म्हणजेच राज्यातून महायुतीला 45 प्लस किंवा महाविकास आघाडीला 30 प्लस जागा मिळण्याची कोणतीच शक्यता नसल्याचं EXIT Poll मधून समोर आलं आहे.

इंडिया टुडे- अॅक्सिस माय इंडिया, एबीपी-सी व्होटर, न्यूज एटिन, चाणक्य, इंडिया टीव्ही-सिएनएक्स, टीव्ही नाईन-पोलस्ट्रेट, टाइम्स नाऊ-इटीजी अशा एकूण सात एक्झिट पोलचा अभ्यास हा बातमीमध्ये करणार आहोत.
इंडिया टुडे- अॅक्सिस माय इंडियाने ४८ जागांपैकी भाजपला २० ते २२ जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3 ते 5 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादी 1 ते 2 जागा, काँग्रेसला ३ ते ४ जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ८ ते १० जागा, उद्धव ठाकरेंच्या सेनेला ९ ते ११ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातून महायुतीला एकूण 28 ते 32 जागा, महाविकास आघाडीला 16 ते 20 जागा आणि इतर पक्षांना 0 ते 2 जागा मिळतील, असा अंदाज इंडिया टुडे- अॅक्सिस माय इंडियाने वर्तवला आहे.

एबीपी-सी व्होटर पोलने महाराष्ट्रात अतितटीचा सामाना होईल, असा अंदाज वर्तवला होता. महाराष्ट्रात महायुतीला 22 ते 26 जागा, महाविकास आघाडीला 23 ते 25 ​​जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. प्रत्येक पक्षांच्या जागांचा विचार केला तर भाजपला १७, शिंदेंच्या शिवसेनेला ६, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १, ठाकरेंच्या शिवसेनेला ९, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ६, काँग्रेसला ८ आणि इतर पक्षाला एक जागा मिळण्याची शक्यता एबीपी-सी व्होटरने वर्तवली आहे.
न्यूज एटिन या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार महायुतीला महाराष्ट्रातून ३२ ते ३५ तर महाविकास आघाडीला १५ ते १८ जागा मिळतील, असा अनुमान दिला आहे. राजकीय पक्षानुसार पाहायचं झाल्यास भाजपला २० ते २२ जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ११ ते १३ जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ० ते १ जागा, काँग्रेसला ६ ते ९, ठाकरेंच्या शिवसेनेला ३ ते ६, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ४ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज न्यूज एटिनच्या एक्झिटने वर्तवण्यात आला आहे.

चाणक्यने केलेल्या सर्व्हेचा अभ्यास केला तर त्या सर्व्हेतून महायुतीला एकूण 28 ते 38 जागांवर आणि महाविकास आघाडीला एकूण 10 ते 20 जागांवर यश मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळणार, याचे अपडेट्स आमच्याकडे नाहीत.

इंडिया टीव्ही-सिएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार पाहायचं झाल्यास महायुतीला 24 ते 32 जागा, महाविकास आघाडीला 17 ते 24 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पक्षांनुसार अंदाज पाहायचा झाल्यास भाजपला 18 ते 22 जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 5 ते 7 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 ते 3 जागा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 ते 13 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 ते 5 आणि काँग्रेसला 4 ते 6 जागा मिळण्याची शक्यता इंडिया टीव्ही-सिएनएक्सच्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.

टीव्ही नाईन- पोलस्ट्रेटच्या एक्झिटपोलनुसार महायुतीला २२, महाविकास आघाडीला २५ आणि इतर पक्षाला १ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजकीय पक्षांनुसार पाहायचं झाल्यास भाजपला सर्वाधिक म्हणजे १८, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ४, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक, ठाकरेंच्या शिवसेनेला १४, काँग्रेसला ५ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ६ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टाइम्स नाऊ-इटीजी या सर्व्हेनुसार महायुतीला २६, महाविकास आघाडीला २२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता जर पक्षनिहाय एक्झिट पोल पाहायचा झाल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ४, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ३ ते ५ जागा, काँग्रेसला ४ ते ५ आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १३ ते १५ जागा मिळू शकतात, असा अंदाज टाइम्स नाऊ-इटीजीने वर्तवला आहे.
आता सात एक्झिट पोलचा थोडक्यात आकडा पहायचं झाल्यास

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियानुसार महायुतीला 28 ते 32 तर महाविकास आघाडीला 16 ते 20, एबीपी-सी व्होटरनुसार महायुतीला 22 ते 26 तर महाविकास आघाडीला 23 ते 25, न्यूज एटिनच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 32 ते 35 तर महाविकास आघाडीला 15 ते 18 जागा, चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 28 ते 38 आणि महाविकास आघाडीला 10 ते 20, इंडिया टीव्ही-सिएनएक्सनुसार महायुती 24 ते 32, तर महाविकास आघाडीला 17 ते 24, टीव्ही नाईन- पोलस्ट्रेटनुसार महायुतीला 22, महाविसाक आघाडीला 25, इतर पक्षांना 01 आणि टाइम्स नाऊ-इटीजीनुसार महायुतीला 26 आणि महाविकास आघाडीला 22 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यातून इतकंच सांगायचं आहे, ते म्हणजे महाविकास आघाडीकडून ३० प्लस असो की महायुतीकडून ४५ प्लस असो, दोन्हीकडून हे आकडे पार करताना दिसत नाहीत, हे नक्की.

Scroll to Top