Categories Uncategorized

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

       आजकाल मोबाईल फोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय. घराबाहेर पडताना वॉलेट नसेल तरी चालेल, पण फोन मात्र हवाच. मात्र घाई-गडबडीत आपण अनेकदा फोन चार्ज करायला विसरतो आणि मग प्रवासात कारमधील USB पोर्ट किंवा चार्जरला फोन लावतो. आपल्याला हे फार सोयीचं वाटतं, पण खरं सांगायचं तर ही सवय तुमच्या महागड्या स्मार्टफोनसाठी धोकादायक ठरू शकते.

घरातल्या प्लगमधून येणारा वीजपुरवठा स्थिर असतो. पण कारमध्ये वीज थेट इंजिनला जोडलेल्या अल्टरनेटरमधून येते. तुम्ही गाडीचा वेग वाढवला, हेडलाईट्स लावले किंवा एसी सुरू केला, की पॉवरमध्ये चढ-उतार होतात. हा अस्थिर विद्युत प्रवाह फोनच्या बॅटरीवर हळूहळू वाईट परिणाम करतो आणि बॅटरीचं आयुष्य कमी होतं.

बहुतेक कारमधील USB पोर्ट हे मुळात म्युझिक सिस्टीम किंवा डेटा ट्रान्सफरसाठी बनवलेले असतात. चार्जिंगसाठी नाही. त्यामुळे त्यांचा आउटपुट खूपच कमी असतो, साधारण 0.5 अँपिअर. यामुळे फोन फार हळू चार्ज होतो. स्लो चार्जिंगमुळे फोन जास्त वेळ गरम राहतो आणि ही उष्णता बॅटरीसाठी अत्यंत घातक असते.

अनेक लोक इंजिन सुरू करतानाच फोन चार्जरला लावतात. पण इंजिन सुरू होताना अचानक हाय व्होल्टेजचा ‘पॉवर स्पाइक’ येतो. हा झटका थेट फोनच्या आतल्या सर्किटपर्यंत पोहोचू शकतो आणि फोन कायमचा खराब होण्याचा धोका निर्माण होतो.
यात भर म्हणजे उन्हाळ्याचं तापमान. बंद कारमध्ये आधीच उकाडा असतो. त्यात फोन जर डॅशबोर्डवर किंवा थेट उन्हात ठेवून चार्ज केला, तर ओव्हरहीटिंगमुळे बॅटरी फुगण्याचे प्रकारही होऊ शकतात. जर तुमची कार जुनी असेल आणि इंजिन बंद असताना तुम्ही फोन चार्ज करत असाल, तर त्याचा परिणाम कारच्या बॅटरीवरही होतो. भविष्यात गाडी स्टार्ट व्हायलाच अडचण येऊ शकते.

म्हणूनच कारमध्ये फोन चार्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
•नेहमी ब्रँडेड आणि प्रमाणित कार चार्जर वापरा.
•इंजिन सुरू झाल्यावरच फोन चार्जिंगला लावा.
•चार्ज होत असताना फोन थेट उन्हात ठेवू नका.
•गरज नसल्यास कारमध्ये फोन 100 टक्के चार्ज करणे टाळा. थोडी काळजी घेतली, तर फोन आणि कार दोन्ही सुरक्षित राहतील.

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *