महाराष्ट्राच्या राजकारणासाठी बुधवारचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचं बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाल्याची अधिकृत माहिती डीजीसीएने दिली. त्यांच्या अकाली निधनाने राज्यासह देशभरात शोककळा पसरली आहे. बेधडक वक्तव्ये, कठोर निर्णयक्षमता आणि मजबूत प्रशासकीय पकड यासाठी ओळखले जाणारे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी नेते होते.
२२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे अजित पवार यांचा जन्म झाला. बारामती तालुक्यातील काटेवाडी हे त्यांचं मूळगाव. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सहकार क्षेत्रातून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. १९८२ साली सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवड होणं ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीची पहिली पायरी ठरली. १९९१ मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले आणि तब्बल १६ वर्षे या पदावर राहिले.

१९९१ साली बारामतीतून लोकसभेत निवडून येत त्यांनी संसदीय राजकारणात पदार्पण केलं. मात्र काका शरद पवार यांच्यासाठी खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी विधानसभेची वाट धरली. काँग्रेस सरकारमध्ये कृषी, ऊर्जा, पाणीपुरवठा तसेच अर्थ व नियोजन यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यभर पक्ष बांधणीत अजित पवार यांची भूमिका निर्णायक ठरली.
जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडवण्यावर भर दिला. २००४ नंतर मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा स्पष्टपणे समोर आली आणि त्याच काळात काका–पुतण्या संबंधांमध्ये पहिली दरी निर्माण झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं गेलं. २०१० मध्ये त्यांनी पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुढील वर्षांमध्ये सिंचन घोटाळा, ईडी चौकशी, राजीनाम्याचे नाट्य अशा अनेक वादळांमधूनही ते राजकारणात टिकून राहिले.
२०१९ चा पहाटेचा शपथविधी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात नाट्यमय टप्पा ठरला. भाजपासोबत केलेली हातमिळवणी, त्यानंतरचा राजीनामा आणि पुन्हा शरद पवारांसोबत येणं, या सगळ्याने अजित पवार कायम चर्चेत राहिले. २०२३ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा वेगळी वाट धरत महायुतीत प्रवेश केला आणि उपमुख्यमंत्रीपद भूषवले.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जोरदार पुनरागमन करत ४१ आमदार निवडून आणले आणि सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम केला. महत्त्वाकांक्षा, रणनीती आणि सत्ताकेंद्रावर पकड ठेवणारे नेते म्हणून अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर खोल ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे.
